अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची विजयी सलामी

महिला एकेरीत अव्वल मानांकित अ‍ॅश्ले बार्टीनेही यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

सर्बियाचा आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन खुल्या स्पर्धेत विजयी सलामी दिली.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने पुरुष एकेरीतील पहिल्या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या होल्गर रुनेवर ६-१, ६-७ (५-७), ६-२, ६-१ अशी मात केली. कारकीर्दीतील विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोव्हिचला रुनेने तोडीसतोड झुंज दिली. त्याला एक सेट जिंकण्यातही यश आले. बिगरमानांकित रुनेला चाहत्यांचा पाठिंबा लाभला. ही बाबही जोकोव्हिचला फारशी रुचली नाही. परंतु तरीही त्याला अपेक्षित विजय मिळवण्यात यश आलेच.

महिला एकेरीत अव्वल मानांकित अ‍ॅश्ले बार्टीनेही यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. दोन ग्रँडस्लॅम विजेत्या बार्टीने २०१०मधील अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपविजेत्या रशियाच्या वेरा झ्वोनारेव्हाला ६-१, ७-६ (९-७) असे पराभूत केले. तसेच १०व्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने पोलोना हेर्कोगचा ६-१, ६-२ असा, तर कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूने व्हिक्टोरिया गोलूबिकचा ७-५, ४-६, ७-५ असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

झ्वेरेव्हची विजयाची मालिका अबाधित
’ जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू आणि टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने आपली विजयाची मालिका अबाधित ठेवली आहे. झ्वेरेव्हने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या सॅम क्वेरीवर ६-४, ७-५, ६-२ अशी मात केली. चौथ्या मानांकित झ्वेरेव्हचा हा सर्व स्पर्धांतील सलग १२ वा विजय ठरला. पुढील फेरीत त्याच्यासमोर स्पेनच्या अ‍ॅल्बर्ट रामोस-व्हिनोलासचे आव्हान असेल.

मी रुनेविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली नाही. प्रेक्षक तुम्हाला पाठिंबा देतील अशी तुम्ही आशा करता. परंतु, ते प्रत्येक वेळी शक्य नसते, इतकेच मी म्हणू शकतो. मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत होतो. -नोव्हाक जोकोव्हिच

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: American open tennis tournamentdjokovic winning opener akp

ताज्या बातम्या