WI vs SL 1st Test Roston Chase Amir Jangu Record: अँटिगा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी इतिहास घडवला. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ३०८ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना, वेस्ट इंडिजने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि ९ बाद ६२६ धावांच्या डोंगराएवढ्या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. यजमान वेस्ट इंडिजची प्रचंड आघाडी आणि मोठी धावसंख्या उभारण्यामागे युवा फलंदाज अमीर जांगू आणि कर्णधार रोस्टन चेस हे खरे हिरो ठरले.
अमीर जांगूचं दुसऱ्याच कसोटी सामन्यात द्विशतक
शे होपच्या दुखापतीमुळे संघात अनपेक्षितपणे बोलावण्यात आलेल्या २८ वर्षीय डावखुऱ्या फलंदाज अमीर जांगूला घेण्यात आलं. अमीर जांगूने मिळालेल्या या संधीचे सोनं केलं आणि क्रिकेट इतिहासात आपली छाप पाडली. आपल्या कसोटी कारकिर्दीतील केवळ दुसराच सामना खेळताना जांगूने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा समाचार घेत शानदार द्विशतक झळकावलं. ३७३ चेंडूंचा सामना करत त्याने १९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३३ धावांची ऐतिहासिक व प्रदीर्घ खेळी साकारली. अमीर जांगूने या कामगिरीसह, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या मागोमाग, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा वेस्ट इंडीजचा तिसरा क्रिकेटपटू ठरला.
वेस्ट इंडिजचे फलंदाज अमीर जांगू आणि कर्णधार रोस्टन चेस यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा विश्वविक्रम केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ४०१ धावांची भागीदारी रचत कसोटी क्रिकेटमधील सहाव्या विकेटसाठीच्या सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम आपल्या नावावर केला. फक्त दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या अमीर जांगूने ३७३ चेंडूत २३३ धावांची दमदार खेळी केली, तर कर्णधार रोस्टन चेस १५५ षटकांअखेर १८४ धावांवर नाबाद होता. दोघांनी मिळून ६०२ चेंडूंचा सामना करत हा ऐतिहासिक पराक्रम गाजवला.
यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांच्या नावावर होता. त्यांनी जानेवारी २०१६ मध्ये केपटाऊन येथील न्यू्लंड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहाव्या विकेटसाठी ३९९ धावांची भागीदारी केली होती. जांगू आणि चेस यांनी ती भागीदारी मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपली नोंद सुवर्णाक्षरांनी केली.
कसोटी क्रिकेटच्या तब्बल १४९ वर्षांच्या इतिहासात सहाव्या विकेटसाठी ४०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी यापूर्वी कधीच झाली नव्हती. वेस्ट इंडिजच्या अमीर जांगू आणि रोस्टन चेस यांनी श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४०१ धावांची भागीदारी रचत हा अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला.
कसोटीत ६ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचणारी जोडी
अमीर जांगू-रोस्टन चेस – वेस्ट इंडिज वि. श्रीलंका – ४०१ धावा
जॉनी बेयरस्टो-बेन स्टोक्स – इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका – ३९९ धावा
बीजे वाटलिंग-केन विलियमसन – न्यूझीलंड वि. श्रीलंका-३६५ धावा
ब्रेंडन मॅक्युलम-बीजे वाटलिंग – न्यूझीलंड वि. भारत – ३५२ धावा
