Indian Womens cricket team Coach Amol Muzumdar: भारतीय महिला संघाचे कोच अमोल मुझुमदार यांनी टीम इंडियाला कमालीचं मार्गदर्शन करत पहिला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. २०२३ मध्ये महिला विश्वचषकाचे प्रशिक्षक झाल्यापासून उत्कृष्ट संघबांधणी करत वर्षानुवर्षे पाहिलेलं विश्वचषकाचं स्वप्न साकारण्यात संघाला मार्गदर्शन केलं. याचबरोबर सध्याच्या घडीला भारताच्या पुरूष संघाची अवस्था पाहता या संघाचं कोचिंग करायला आवडेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

लोकसत्ता गप्पा या कार्यक्रमासाठी भारताच्या विश्वचषक विजेत्या पुरूष संघाचे कोच अमोल मुझुमदार यांनी उपस्थिती लावली होती. नॉरर्न रिअल्टी मुख्य प्रायोजक आणि केसरी टूर्स सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर एम के घारे ज्वेलर्स आणि हावरे प्रॉपर्टीज आहेत. या कार्यक्रमात बोलताना अमोल मुझुमदारांनी पुरूष क्रिकेट संघांबद्दल बोलणं टाळलं.

कोच की खेळाडू कोणता रोल जास्त आवडतो, असा प्रश्न कोच अमोल मुझुमदार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “या क्षणी तुम्ही मला विचाराल तर कोचही भूमिका आवडते. कारण तुम्ही काहीतरी देत आहात. खेळाडू म्हणून तुम्ही सातत्याने बोध घेत असता, शिकत असता काहीतरी घेत असता. पण कोच म्हणून तुम्ही देताय परत. त्यामुळे हा रोल नक्कीच आवडतो.”

यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुम्ही मगाशी कसोटी क्रिकेटबद्दल सांगितलंत, तर भारताच्या कसोटी संघाची आर्त साद तुमच्या कानी नाही का पडत आर्त साद… कोचिंगबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्यावरून तुम्ही कधीतरी स्विच करावंसं वाटेल का, सध्या तुमची गरज सध्याच्या पुरूष क्रिकेट संघाला आहे. तुम्हाला भारताच्या पुरूष संघाचं कोचिंग करायला आवडेल का?’ मुलाखतकर्त्यांनी म्हटलं की ‘क्रिकेटप्रमाणे स्लिपमध्ये आम्ही उभे आहोत, त्यामुळे तुम्ही फार संयमाने बॅटिंग करताय तर या प्रश्नाचं उत्तर द्यावं.’

यावर अमोल मुझुमदारांनी भन्नाट उत्तर दिलं की “मला ३ फुटांवरूनही हा प्रश्न ऐकू येत नाहीये. सहसा फलंदाज व स्लिपमधील फिल्डरमध्ये २-३ फुटांंचं अंतर असतं.” यावरून कोच अमोल मुझुमदार यांनी हे उत्तर दिलं. भारतीय पुरूष कसोटी संघाने गेल्या प्रशिक्षखक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली घरच्या मैदानावर कसोटीत दोन मालिका गमावल्या. न्यूझीलंडविरूद्ध ३-० तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २-० असा व्हाईटवॉश टीम इंडियाला पत्कारावा लागला. यामुळे भारतीय संघाचं कोचिंग आणि संघाची कामगिरी हे सध्या चर्चेतील विषय आहेत.