भारताच्या महिला वर्ल्डकप विजेत्या संघाचे कोच अमोल मुझुमदार हे नाव देशांतर्गत क्रिकेटमधील मोठं नाव आहे. अमोल मुझुमदार यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत खोऱ्याने धावा केल्या. अंडर-१५, १६, १८, १९ पासून त्यांनी धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. लागोपाठ शतकी खेळी केल्यानंतरही अमोल मुझुमदारांना रणजी ट्रॉफीसाठी मुंबईकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण त्यांना रवी शास्त्रींचा मेसेज कसा आला आणि त्यांनी पदार्पण केलं, याचा किस्सा सांगितला.
लोकसत्ता गप्पा या कार्यक्रमात बोलताना कोच अमोल मुझुमदार म्हणाले, “सुरूवातीपासून वडील आणि आचरेकर सरांनी एकच सांगितलं होतं, धावा करत राहा. डोक्यात एकच होतं अंगात भिनलेलं होतं की धावा करायच्या आहेत. मी अंडर-१५ पासून सुरूवात केली. अंडर-१५, १६ मग अंडर -१९ गेलो. मी तेव्हा कर्णधार होतो. सीझन संपला आणि त्यावर्षी १९९३-९४ चा सीझन होता. मी त्यावर्षी प्रत्येक मॅचला शतक केलं. तेव्हा मी माझे सहकाऱ्यांना सांगायचो, ही माझी लास्ट मॅच, आता मला रणजीला जायचं आहे. मी परत पुन्हा अंडर-१९ मॅचला खेळायला उतरायचो. तेही म्हणायचो या मुझुमदार या. असं करत करत पूर्ण सीझन गेला. गुजरातविरूद्ध विजयवाड्याला फायनल होती, तेव्हा मी दोन्ही इनिंगला शतक केलं. तेव्हा असं वाटलं, यापलीकडे काही नाही. तेव्हा मला वाटलं आता तरी माझी रणजीसाठी निवड होईल. तेव्हा प्रत्येक मॅचला मला लागत होतं, वाईट वाटत होतं की रणजी ट्रॉफीसाठी माझी निवड का होत नाहीये, एवढे रन्स केले तरी निवड होत नाहीये.”
“माझ्या आतमध्ये एक इच्छा होती की रणजी ट्रॉफीसाठी एकदा तरी माझी निवड होऊदे. मग एक दिवस मी मी शिवाजी पार्कला जिमखानाच्या मागे मित्र मंडळी बसायचो, तिथे व्हाया व्हाया रवि शास्त्रींचा मेसेज आला. शास्त्री म्हणाले होते की, अमोलला सांगा तो क्वार्टर फायनलमध्ये पदार्पण करेल आणि फक्त पदार्पण नाही तो ४ नंबरवर फलंदाजीला उतरेल. कोणीतरी माझ्याकडे तो मेसेज घेऊन आला. क्वार्टर फायनल कधी होती, सात दिवसांनी. म्हणजे काय कमालीचं नेतृत्त्व आहे शास्त्रींचं. त्यांनी मला ७ दिवस आधी तयारी करण्यासाठी वेळ दिला. ते मला आदल्या दिवशी सांगू शकत होते, पण काय लीडर आहेत. आणि तो दिवस आला. माझ्यामते १२ फेब्रुवारी १९९४, त्यादिवशी मला मुंबईची कॅप मिळाली. जर मी आतमध्ये राहिलो, जर ३०-४० धावा केल्या, तर मी सोडणार नाही. नेमकं त्या मॅचला सचिन, विनोद, संजय मांजरेकर न्यूझीलंडला गेले होते. मी इनिंगमध्ये विचार करत होतो, हे लोक जरी परत आले तरी माझी जागा राहिली पाहिजे आणि ती राहिली.”
