Among the players with the highest original price Harmanpreet kaur smriti Mandhana ysh 95 | Loksatta

सर्वाधिक मूळ किंमत असलेल्या खेळाडूंत हरमनप्रीत, मानधना

१३ फेब्रुवारीला मुंबईत लिलाव; ४०९ खेळाडूंची अंतिम यादी

sp womens ipl
सर्वाधिक मूळ किंमत असलेल्या खेळाडूंत हरमनप्रीत, मानधना

वृत्तसंस्था, मुंबई : महिला प्रीमियर लीगचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. स्पर्धेची आयोजनाचे स्थळ निश्चित झाल्यावर २४ तासांत लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची लिलावाची पद्धतीही निश्चित करण्यात आली असून, भारताच्या हरमनप्रीत, स्मृती मानधनासह २४ खेळाडूंची सर्वाधिक ५० लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटूंचा १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतच लिलाव होणार असून, यामध्ये एकूण ४०९ खेळाडूंचा लिलाव होईल. लिलावासाठी १५२५ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. यातून मंगळवारी अंतिम खेळाडूंची यादी त्यांच्या मूळ किमतीसह निश्चित करण्यात आली. 

या लीगदरम्यान महिलांची ट्वेन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असेल. भारत-पाकिस्तान सामना १२ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत मिळालेल्या खेळाडूंमध्ये १३ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन, डिआंड्रा डॉटिन या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर ४० लाख ही दुसऱ्या क्रमांकाची मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी ३० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. नवोदित खेळाडूंसाठी १० आणि २० लाख मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यांचा सर्वप्रथम लिलाव होईल. लीगमध्ये सहभागी पाच संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये खर्च करता येतील. प्रत्येक संघाला १५ ते १८ खेळाडू संघात घेता येणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहेत.

लिलावाबाबत..

  • नोंदणी केलेल्या एकूण

खेळाडू : १५२५

  • लिलावपात्र खेळाडू : ४०९
  • भारतीय खेळाडू : २४६
  • परदेशी खेळाडू (यातील आठ खेळाडू सहयोगी सदस्य देशांच्या) : १६३
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या : २०२
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलल्या : १९९
  • सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत : २४
  • ५० लाख मूळ किंमत असलेल्या परदेशी खेळाडू : १३
  •   लिलावात ४० लाख मूळ किंमत असणाऱ्या खेळाडू : ३०

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:57 IST
Next Story
तीन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची तयारी