रविवारी (५ जून) रोलँड गॅरोसच्या इतिहासामध्ये राफेल नदाल हे नाव सुवर्णअक्षरांमध्ये लिहिले गेले. लाल मातीचा बादशाह अशी ओळख असलेल्या राफेलने इतिहास रचत आपले २२वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा ६-३, ६-३,६-० असा पराभव करत हे दैदिप्यमान यश मिळवले. विजयी फटका मारल्यानंतर राफेलला आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवणे कठीण गेले.

राफेलने कॅस्पर रुडचा पराभव करून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील आपले १४वे विजेतपद मिळवले. या विजेतेपदासह आता त्याच्या नावावर एकूण २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांची नोंद झाली आहे. दुसऱ्या सेटमध्ये ३-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर नदालने शेवटचे सलग ११ गेम आपल्या नावे केले. अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर त्याचे डोळे पाणावले.

आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर राफेल नदालने इतिहास रचला. २००५ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी रोलँड गॅरोस येथे नदालने पहिला विजय मिळवला होता. याठिकाणी १४ वेळा विजेतेपद पटकवण्याची कामगिरी अद्याप कुणालाही शक्य झाली नव्हती. नदालने ही कामगिरी करून दाखवली आहे.

नदालचा हा विजय आणखी एका कारणामुळे विशेष ठरला. अंतिम सामन्यातील त्याचा प्रतिस्पर्धी असलेला आठवा मानांकित कॅस्पर रूड हा राफेलच्याच अकादमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला आहे. २३ वर्षीय रूड पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होता. मात्र, नदालच्या अनुभवापुढे रूड कमी पडला आणि त्याला पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा – Happy Birthday Ajinkya Rahane : मराठमोळ्या जिंक्सबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

राफेल नदालपेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जेतेपदे आतापर्यंत कोणीही जिंकलेली नाहीत. नदाल आता मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रॉजर फेडररपेक्षाही दोन पावले पुढे आहे.