पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत अनिश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सातव्या फेरीअखेर आनंद तिसऱ्या स्थानी आहे. स्पर्धेच्या अध्र्या टप्प्यापर्यंत आनंदने चार गुणांची कमाई केली आहे. उर्वरित टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आनंद आतुर आहे.
अन्य लढतीत रशियाच्या पीटर स्विडलरविरुद्ध अमेरिकेच्या फॅबिआओ कारुआनाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. सर्जेय कर्जाकिन आणि लेव्हॉन अरोनियन यांच्यातील लढत बरोबरीत संपली. अमेरिकेच्या हिकारू नाकुमाराने बल्गेरियाच्या व्हेसलिन टोपालोव्हवर मात केली. सातव्या फेरीअखेर कर्जाकिन आणि अरोनियन ४.५ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत.
पहिल्या टप्प्यात आनंदने बल्गेरियाच्या व्हेसलिन टोपालोव्ह आणि रशियाच्या पीटर स्विडलर यांच्याविरुद्ध विजय मिळवला. सर्जेय कर्जाकिनविरुद्ध आनंदला पराभवाला सामोरे जावे लागले तर चार लढती त्याने बरोबरीत सोडवल्या. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने सफाईदार खेळ केला.