आघाडीवीर सर्जी कर्जाकिन याच्यापेक्षा दीड गुणाने पिछाडीवर असूनही विश्वनाथन आनंद याला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळण्याची आशा वाटत आहे. कर्जाकिन याचे साडेपाच गुण असून आनंदचे चार गुण झाले आहेत. स्पर्धेच्या उर्वरित दोन फेऱ्या बाकी आहेत. आनंदला आठव्या फेरीत नॉर्वेच्या जॉन लुडव्हिग हॅमर (१.५ गुण) याच्याशी खेळावे लागणार आहे. ही लढत तो सहज जिंकेल अशी आशा आहे. कर्जाकिन याला पीटर स्वेडलर (३.५) याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसन (५ गुण) याच्यापुढे चीनच्या वाँग हाओ (२.५ गुण) याचे आव्हान असेल. अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन (४ गुण) याला व्हॅसेलीन तोपालोव्ह (३ गुण ) याच्याबरोबर खेळावे लागेल.