कार्लसनविरुद्ध बरोबरी
माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत विजयाची संधी गमावली. त्याला विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करून अखेपर्यंत सामन्यातील उत्सुकता ताणून धरली होती. सुरुवातीला सामन्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या आनंदला कार्लसनच्या पलटवारामुळे माघार घ्यावी लागली. अखेर दोन्ही खेळाडूंनी डाव बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या दिवशी फ्रान्सच्या मॅक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्हने बल्गेरियाच्या व्हेसेलीन तोपालोव्हचा पराभव केला. या पराभवामुळे तोपालोव्हला स्पधेतील अव्वल स्थान टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. इतर लढतीत नेदरलँडचा ग्रँडमास्टर अनिष गिरीने पराभव टाळत रशियाच्या अलेक्झेंडर ग्रिशचुकला बरोबरीत रोखले, तर हिकारू नाकामुराने कडवा संघर्ष करत फॅबिआनो कारुआनाला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.