बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले. त्याने भारताच्या नीरज चोप्राचा विक्रमही मोडला. त्यामुळे त्याची भारतातही चर्चा आहे. नदीमने सुवर्णपदक पटकावल्यानंतर नीरजने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नदीमनेही नीरज आपला चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. या दोघांतील खिलाडूवृत्ती भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना फार भावली आहे. महिंद्रांनी ट्वीट करून दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या देशासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्शदने ९१.१८ मीटर अंतरावर भालाफेकून भारताच्या नीरज चोप्राचा विक्रमही मोडला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमने सोशल मीडियावर पोस्ट केली. “अल्लाह आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ९१.१८ मीटरसह भालाफेक करून सुवर्ण मिळवले,” असे कॅप्शन देऊन त्याने आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्शदच्या पोस्टवर भारताचा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कमेंट केली आहे. “अभिनंदन अर्शद भाई. सुवर्णपदक आणि ९० मीटर अंतर पार करून विक्रम केला. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा,” अशी कमेंट नीरजने केली आहे.

नीरजची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावरील घडामोडींकडे उद्योगपती आनंद महिंद्रांचे बारीक लक्ष असते. नीरज आणि नदीम यांची गोष्टही त्यांच्यापर्यंत पोहचली. महिंद्रांना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचे फार कौतुक वाटले. त्यांनी दोघांसाठी एक खास ट्वीट केले आहे. त्यांनी नीरजच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, ‘स्पर्धा आणि शत्रुत्व यातील योग्य फरक दाखवून देण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदक दिले पाहिजे.’

हेही वाचा – CWG 2022: पाकिस्तानच्या भालाफेकपटूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; नीरज म्हणाला, “अर्शद भाई…”

दरम्यान, जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नीरज चोप्रा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला सहभागी होता आले नाही. या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नीरज चोप्रा निराश झाला होता. त्याने चाहत्यांची माफीही मागितली होती. नीरज सहभागी न होऊ शकलेल्या स्पर्धेतच पाकिस्तानच्या इर्शाद नदीमने सुवर्णपदक पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra reacts as neeraj chopra congratulates pakistans arshad nadeem vkk
First published on: 09-08-2022 at 10:52 IST