देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस

Anaya Bangar to Play cricket after Gender Transition surgery: भारताचे माजी क्रिकेट संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा क्रिकेटमुळे चर्चेत आली आहे. यावर्षी मार्चमध्ये लिंग-पुष्टीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ती क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. मात्र, बालपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या अनायाला पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळाली आहे. मुंबईकडून अंडर-१९ क्रिकेट खेळलेल्या अनाया बांगरला आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार आहे. तिला ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे.

अनायाचे वडील संजय बांगर हे भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू असून त्यांनी भारतीय पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. अनायाने यापूर्वी मुंबईकडून वयोगटातील क्रिकेट खेळताना कसोटीपटू सर्फराझ खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे.

पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही असं वाटलं होतं – अनाया बांगर

अनाया बांगरला लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ऑस्ट्रेलियातील महिला कम्युनिटी क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. अनाया सध्या २५ वर्षांची असून तिने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, विशेषतः मी पुन्हा क्रिकेट खेळू शकते हे समजल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. एक वेळ अशी आली होती की मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, असं मला वाटलं होतं. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार, त्यांनी मला पुन्हा एक संधी दिली.”

अनायाने सांगितलं की, ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी असलेल्या पात्रता निकषांबाबत माहिती घेण्यासाठी तिने गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) पत्र लिहिलं होतं. मात्र, अद्याप BCCIकडून तिला कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. यावर्षी जूनमध्ये अनायाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला. २० जुलै रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलं की, ती तातडीने कम्युनिटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करू शकते. मात्र, वुमन्स बिग बॅश लीग (WBBL) सारख्या ‘एलिट क्रिकेट’मध्ये खेळण्यासाठी तिला टेस्टोस्टेरॉनशी संबंधित पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनाया बांगरच्या पत्राला काय उत्तर दिलं?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या Transgender and Gender Diverse Players in Elite Cricket Policyनुसार, एलिट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खेळाडूच्या रक्तातील सीरम टेस्टोस्टेरॉनची पातळी किमान १२ महिने १० nmol/L (नॅनोमोल्स प्रति लिटर) पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दरम्यान, २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुषत्वाच्या वयात (male puberty) प्रवेश केलेल्या ट्रान्सजेंडर खेळाडूंना एलिट महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली होती.

दरम्यान, अनायाच्या पत्राला उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी विभागाच्या प्रमुख जॅकी पॅट्रिज यांनी सांगितलं की, मार्च २०२७ पर्यंत अनाया ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रीमियर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र असेल. प्रीमियर क्रिकेटला ‘एलिट क्रिकेट’ऐवजी ‘कम्युनिटी क्रिकेट’ म्हणून वर्गीकृत करण्यात आल्याने त्यात खेळण्यावर या धोरणाचा परिणाम होणार नाही.

ट्रान्स महिला खेळाडूंबाबत काय आहे BCCIचा नियम?

BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “ट्रान्स महिला खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत मंडळाकडे सध्या कोणतंही धोरण नाही. ICCने एलिट महिला क्रिकेटमध्ये अशा सहभागाला परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत काय करता येईल, याबाबत BCCIने अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे असं प्रकरण पहिल्यांदाच समोर आलं आहे, त्यामुळे मंडळाने अद्याप आपली भूमिका निश्चित केलेली नाही. विशेषतः देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा खेळाडूंना परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही.”

पॅट्रिज यांनी पुढे स्पष्ट केलं, “मार्च २०२७ पासून एलिट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर तुम्हाला रक्तचाचणी करावी लागेल. त्यामध्ये तुमच्या सीरम टेस्टोस्टेरॉनची पातळी १० nmol/L पेक्षा कमी असल्याचं आणि धोरणातील पात्रता निकष तुम्ही अद्याप पूर्ण करत असल्याचं सिद्ध होणं आवश्यक आहे.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाबद्दल अनायाने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ट्रान्स महिलांच्या महिला क्रिकेटमधील सहभागाबाबत निष्पक्षता आणि समावेशकतेवर भर देणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रगतीशील धोरणांमुळे ही माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्यासारख्या इतर खेळाडूंसाठीही मोठी गोष्ट आहे. अनेकांना खेळ किंवा लिंग-बदल प्रक्रिया यापैकी एकाची निवड करावी लागते, त्यामुळे ते खेळात सहभागी होण्याचा प्रयत्नही करत नाहीत.”

लिंग बदल शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच अनाया सध्या ऑस्ट्रेलियातील एखाद्या क्लबकडून खेळण्याची संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करत अनायाने BCCI आणि ICCच्या प्रतिनिधींसह ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी धोरण तयार करण्याबाबत चर्चा करण्याची मागणी केली होती. हे धोरण जुन्या समजुतींऐवजी वैज्ञानिक आणि उपलब्ध डेटाच्या आधारावर तयार करण्यात यावं, असं तिने म्हटलं होतं.

अनाया म्हणाली, “मी माझा अ‍ॅथलीट टेस्टिंग रिपोर्ट आणि इतर सर्व माहिती सार्वजनिक केल्यानंतरही BCCIने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याउलट, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझा रिपोर्ट वाचला, माझ्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासाचा आढावा घेतला आणि माझ्या या प्रकरणात योग्य पद्धतीने मूल्यांकन केलं. सगळं व्यवस्थित झालं आणि माझी कामगिरी चांगली राहिली, तर मला WBBLमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते,” असंही अनायाने सांगितलं.