Anaya Bangar On Marizanne Kapp: अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनायाला क्रिकेटवर किती प्रेम आहे हे तिने अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन व्यक्त केलं आहे. अनेकदा ती क्रिकेट खेळतानाही दिसून आली आहे. लिंग पुष्टीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ती क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. पण आता ती पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. यावेळी ती उच्च स्तरावर क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. तिला ऑस्ट्रेलियामध्ये कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. यासह ती ऑस्ट्रेलियातील वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेसाठीही पात्र ठरु शकते. यावरुन दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मॅरिझान कॅपने विरोध करत मोठं वक्तव्य केलं होतं. आता अनायाने तिला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अनाया बांगर सध्या क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियातील कम्युनिटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. इथून ती महिला बिग बॅश लीग स्पर्धेसाठी पात्र ठरू शकते. यावरून तिने आनंद व्यक्त केला होता. पण दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मॅरिझान कॅपने हा मूर्खपणा आहे, असं म्हणून विरोध केला होता. आता यावर अनाया बांगरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनाया बांगरची पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत, कॅपने “हा मूर्खपणा असून, असं व्हायला नको..” असं लिहिलं होतं. त्यानंतर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अनायाने कॅपला प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, “विरोध करणाऱ्यांनी आधी हा विषय समजून घ्यायला हवा.”
अनाया बांगर म्हणाली, “जे लोकं या गोष्टीचा विरोध करत आहेत, त्यांनी आधी स्वतः हा विषय समजून घ्यायला हवा. या गोष्टी समजून घेण्यासाठी जी माहिती हवी आहे, ती मी आधीच उपलब्ध करून दिली आहे. मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करत आहे.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनुमती दिल्यानंतर, ती सध्यातरी ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळत नाहीये. पण ती ऑस्ट्रेलियातील कुठल्याही राज्यातील प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र आहे. काही स्थानिक क्रिकेट क्लब तिच्या संपर्कात आहेत. सध्या ती योग्य संघाची निवड करत आहे. आता ती स्वतःला सिद्ध करून महिला बिग बॅश लीग स्पर्धेसाठी पात्र ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
