‘अंतिम फेरी होती.. समोरची प्रतिस्पर्धी कोरियनच.. साहजिकच घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा तिलाच मिळत होता.. मानसिक दबाव माझ्यावरच होता.. फेरीतील प्रत्येक ‘शूट’ नंतर प्रेक्षक तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करायचे.. मी आघाडी घेतली की मात्र सर्वत्र स्तब्धता.. या स्तब्धतेतूनच माझा निर्धार वज्राहूनही कठोर होत गेला.. आणि सर्व दडपण झुगारून मी अंतिम लक्ष्य गाठत सुवर्णपदक ‘शूट’ केले..’ आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्ण‘भेद’ करणाऱ्या राही सरनोबतने हा रोमांचकारी अनुभव सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला..  विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी राही बोलत होती. यावेळी तिला पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.
या वेळी ती पुढे म्हणाला की, यावर्षीपासून खेळाच्या स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. नवीन स्वरुप आव्हानात्मक आहे. मात्र अंतिम फेरीत माझी कामगिरी नेहमीच चांगली होते. त्याचे मला दडपण येत नाही. आणि त्यामुळे सुवर्णपदकावर नाव कोरता आल्याचे तिने पुढे सांगितले. नवीन स्वरुपात काही गुण-दोष आहेत. पात्रता फेरीचे गुण अंतिम फेरीत गणले जात नाहीत.
अंतिम फेरीत राही आणि तिची कोरियन प्रतिस्पर्धी यांनी एकेक फेरी जिंकली. मात्र राहीने तिसरी फेरी जिंकत आघाडी घेतली. परंतु किमने पुढच्या दोन फेऱ्या जिंकत ६-४ अशी भक्कम आघाडी घेतली. सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी राहीला पुढची फेरी जिंकणे आवश्यक होते. या मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत राहीने सहावी आणि सातवी फेरीजिंकत सुवर्णपदकावर कब्जा केला.
पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी मी पहिली भारतीय खेळाडू याची मला कल्पनाच नव्हती. ही गोष्ट कळल्यानंतर माझा विश्वासच बसेना, तुम्ही याविषयी खात्री केली आहे ना? असे अधिकाऱ्यांना विचारल्याचे राही म्हणाली. पण थोडय़ाच वेळात भारतीय राष्ट्रीय नेमबाजीच्या पदाधिकाऱ्यांनी सुवर्णपदकासाठी अभिनंदन केले आणि माझी खात्री पटली.
लंडन ऑलिम्पिकनंतर पिस्तुलचा प्रकार आणि ग्रिप बदलली. प्रशिक्षणाची पद्धतीतही काही बदल केले. शारीरिक व्यायामात वेट बॅलन्स ट्रेनिंगचा समावेश केला. कोरियात मिळवलेल्या यशात या सगळ्या गोष्टींची एकत्रित भूमिका आहे. प्रशिक्षक अॅनाटोली पिब्डुनल यांनी सांगितलेल्या डावपेचांनुसार खेळले आणि म्हणूनच हे यश साकारले. सरावासाठी गन फॉर ग्लोरी आणि लक्ष्य यांची साथ मिळाल्याने, खेळ सोडून अन्य गोष्टींची कधीही काळजी करावी लागत नाही असे राहीने सांगितले.
पुढच्या वर्षी होणारी जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल तसेच आशियाई खेळांमध्ये कामगिरीत सातत्य टिकवणे हेच उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले. सुवर्णपदक मिळाले असले तरी माझी कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे या यशाने हुरळून जाण्याऐवजी कसून सरावाला लागणार असल्याचे राहीने सांगितले.
नेमबाजीमुळे फारसा मोकळा वेळ मिळत नाही, मात्र ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका आवर्जुन बघत असल्याचे तिने सांगितले. कोरिया भारतापेक्षा चार तास पुढे आहे. त्यामुळे तिकडे ही मालिका रात्री उशिरा प्रसारित होते. इंटरनेटवरून डाऊनलोड करून सकाळी या मालिकेचा भाग पाहिल्याची धमाल आठवण राहीने सांगितली. 

कोरिया आणि आपल्या वेळेत चार तासांचे अंतर आहे. आम्ही सकाळपासूनच निकालाची वाट पाहत होतो. राहीच्या भावाने इंटरनेटच्या माध्यमातून बातमी कळवली, त्याशिवाय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राहीला मार्गदर्शन करणाऱ्या नेमबाजी प्रशिक्षक शीला कनुंगो यांनी आम्हाला फोनवरून सुखद धक्का दिला.  आमच्या घराण्यात कोणीही या खेळाशी निगडीत नाही. शाळेत एनसीसीच्या माध्यमातून राहीला या खेळाची गोडी लागली. तिने खेळात अतिशय कमी कालावधीत सकारात्मक वाटचाल केली त्यामुळे तिच्या आवडीला विरोध करण्याचा प्रश्नच आला नाही.
– प्रभा सरनोबत, राहीची आई