Andre Russell IPL Retirement: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याने आपला निर्णय जाहीर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने अलिकडेच आंद्रे रसेलला पुढील हंगामासाठी रिलीज केलं होतं. रसेल लिलावात उतरेल अशी अपेक्षा होती. पण, त्याने आता आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच तो केकेआर संघाचा भाग राहणार असल्याची माहिती दिली आहे.

आंद्रे रसेलने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाची जर्सी घालत आणि संघाबरोबरचे काही सुंदर क्षण असलेला हा भावुक व्हीडिओ रसेलने शेअर करत आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं. यासह तो केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग मात्र असणार आहे.

रसेलने २०१२ मध्ये दिल्ली कॅपिटल्स (त्यावेळची दिल्ली डेअरडेव्हिल्स) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो २०१४ मध्ये केकेआरमध्ये सामील झाला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने १४० सामने खेळत अपवादात्मक कामगिरी केली. त्याने ११५ डावांमध्ये २६५१ धावा केल्या. त्याची सरासरी २८.२० होती आणि त्याचा स्ट्राईक रेट १७४.१७ होता.

रसेलने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आणि १२१ डावांमध्ये १२३ बळी घेतले. त्याच्या शेवटच्या आयपीएल हंगामात, त्याने १० डावांमध्ये १६७ धावा केल्या आणि ८ बळी घेतले.

रसेलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिलं, “मी आयपीएलमधून निवृत्त होत आहे. हा एक अद्भुत आयपीएल प्रवास होता. १२ हंगामांच्या सुंदर आठवणी आणि केकेआर कुटुंबाकडून भरपूर प्रेम. मी अजूनही जगभरातील इतर लीगमध्ये षटकार मारताना दिसेन आणि विकेट घेत राहीन आणि सर्वात चांगली गोष्ट माहितीये? मी केकेआर कुटुंबाचा भाग असणार आहे. २०२६ मध्ये केकेआर सपोर्ट स्टाफमध्ये तुम्हाला मी पॉवर कोच म्हणून एका नवीन भूमिकेत दिसेन. नवा अध्याय. तीच ऊर्जा. कायमचं नाइट संघाचा सदस्य.”

आंद्रे रसेलने त्याच्या कारकिर्दीत दोन आयपीएल जेतेपदं जिंकली आहेत. तो २०१४ आणि २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या विजेत्या संघाचा भाग होता. त्याने २०१५ आणि २०१९ मध्ये दोनदा आयपीएल एमव्हीपी पुरस्कारही जिंकला. गेल्या काही हंगामांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न राहिल्याने त्याला रिटेन करण्यात आलं नाही. पण केकेआर संघ सोडून इतर कोणत्या संघात जाण्यापेक्षा त्याने कायरन पोलार्डप्रमाणे निवृत्तीचा निर्णय घेत संघाप्रती निष्ठा दाखवली.