Andrew Flintoff Son Rocky Flintoff Record: ज्या वयात बहुतांश क्रिकेटपटू संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येतात, त्याच वयात इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्रयू फ्लिंटॉफच्या मुलाने इतिहासाला गवसणी घातली आहे. अँड्रयू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफने वयाच्या १८ व्या वर्षी फलंदाजी करताना ऐतिहासिक खेळी केली आहे. रॉकीने इंग्लंडमधील वनडे कप स्पर्धेत लंकाशायर संघाकडून खेळताना सोमररेट संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७६ चेंडूंमध्ये १२३ धावांची दमदार शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने १३६ वर्षांत जे कोणालाच जमलं नव्हतं, असा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रॉकी फ्लिंटॉफ हा लंकाशायरच्या वरिष्ठ संघासाठी शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात फलंदाजी करताना रॉकीने सोमरसेट संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. हे शतक त्याने वय १८ वर्ष १२६ दिवस इतकं असताना झळकावलं आहे. यासह त्याने आर्ची मॅकलारेनचा १३६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या वादळी खेळीच्या बळावर लंकाशायर संघाने ५० षटकांअखेर ६ गडी बाद ४४३ धावा केल्या. यासह लंकाशायर संघाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली.
रॉकीसह किटन जेनिंग्सने देखील दमदार फलंदाजी केली. दोघांनी मिळून २१४ धावांची भागीदारी केली. जेनिंग्सने चौकार- षटकारांचा पाऊस पाडत १२७ चेंडूंमध्ये १५६ धावांची खेळी केली. हा सामना लंकाशायर संघाने १७४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
रॉकीची ऐतिहासिक खेळी….
याआधी मॅकलारेनने १८९० मध्ये फलंदाजी करताना १०६ धावांची शतकी खेळी केली होती. त्यावेळी त्यांचं वय १८ वर्ष २५६ दिवस इतकं होतं. आता रॉकीने शतक झळकावलं, त्यावेळी त्याचं वय १८ वर्ष १२६ दिवस इतकं आहे. यासह त्याने १३६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून काढला आहे. रॉकी फ्लिंटॉफ आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याचे वडील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे रॉकीवरही चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. पण त्याने कुठल्याही दबावात न येता, कमी वयातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. याआधी इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघासाठी फलंदाजी करतानाही त्याने अनेक शतकं झळकावली आहेत. २०२५ च्या सुरुवातीला त्याने इंग्लंड लायन्स संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध खेळताना दमदार शतकं झळकावली होती.
