सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने सुरूवातीचे ३ सामने एकतर्फी जिंकत मालिका आपल्या नावे केली. यानंतर आता इंग्लंड संघ सध्या टीकेचा सामना करावा लागत आहे. यादरम्यानच इंग्लंडच्या माजी खेळाडूने वयाच्या ४८व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉसने पुन्हा लग्न केलं आहे. त्याने त्याची मैत्रीण अँटोनियाशी लग्न केलं आहे. स्ट्रॉस आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये १८ वर्षांचा फरक आहे. ४८ वर्षीय स्ट्रॉसने ३० वर्षीय अँटोनियाशी लग्न केलं आहे. या जोडप्याचं लग्न दक्षिण आफ्रिकेतील फ्रँशहोक या छोट्या शहरात झालं. अँड्र्यू स्ट्रॉसने इन्स्टाग्रामद्वारे आपल्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली आणि तो दिवस त्याचा सर्वात खास दिवस असल्याचं म्हटलं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी अँड्र्यू स्ट्रॉसने दुसरं लग्न केलं.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अँड्र्यू स्ट्रॉस क्रीम कलरच्या सूटमध्ये दिसत आहेत, तर अँटोनियाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. स्ट्रॉसने कॅप्शनमध्ये लिहिलं की त्यांनी हा सुंदर दिवस आणि क्षण जगातील त्यांच्या आवडत्या ठिकाणी साजरा केला. स्ट्रॉसने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने त्याच्या मुलांबरोबरही फोटो शेअर केला आहे.

अँड्र्यू स्ट्रॉसच्या पहिल्या पत्नीचं नाव रूथ होतं, जी ऑस्ट्रेलियन अभिनेत्री होती. २०१८ ख्रिसमसनंतर फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे तिचं निधन झालं. रूथ हिच्या मृत्यूपूर्वी दोघेही १५ वर्षे एकत्र होते. स्ट्रॉस व रूथ यांना दोन मुले आहेत. अँड्र्यू स्ट्रॉस आणि अँटोनिया स्ट्रॉस हे दोघेही दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा एकत्र दिसले होते. पण, डेली मेलमधील वृत्तानुसार, त्यांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. यावर्षी विम्बल्डनमध्येही ते एकत्र दिसले होते.

कोण आहे अँड्रयू स्ट्रॉसची दुसरी पत्नी?

अँटोनिया पूर्वी पीआर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती, पण आता ती लिनियस फाइन आर्ट अॅडव्हायझरी लिमिटेड ही स्वतःची कंपनी चालवते. अँटोनियाचं बालपण हाँगकाँगमध्ये गेलं आहे आणि सेंट मेरी कॅल्ने स्कूल फॉर गर्ल्समध्ये तिने शिक्षण घेतलं, ज्याची वार्षिक फी भारतीय रुपयांमध्ये ४८.३५ लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं.