Andy McBrien and Mark Eder create history: लंडनमधील लॉर्ड्स येथे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडने १० गडी राखून विजय मिळवला. हा सामना हरल्यानंतरही आयर्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये एका खास विक्रमाची नोंद केली आहे. आठव्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी संघासाठी हा पराक्रम केला आहे. खरं तर, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अँडी मॅकब्राईन आणि मार्क एडेर यांनी आयर्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी केली.
अँडी मॅकब्राईन आणि मार्क एडेरने रचला इतिहास –
हा पराक्रम आयर्लंडच्या दुसऱ्या डावात झाला. संघाने दुसऱ्या डावात ९ बाद ३६२ धावा केल्या होत्या. दरम्यान, अँडी मॅकब्राईन आणि मार्क एडेर यांनी संघासाठी सर्वात मोठी भागीदारी केली. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी ही भागीदारी झाली. दोघांनी मिळून १६५ चेंडूत १६३ धावा केल्या. आयर्लंड क्रिकेटसाठी कसोटीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.




अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग जोडीचा मोडला विक्रम –
यादरम्यान अँडी मॅकब्राईनने १४ चौकारांच्या मदतीने ८६ धावांची नाबाद खेळी केली, तर मार्क एडेअरने ७७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ८८ धावा केल्या. याआधी आयर्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांच्या नावावर नोंदवला गेला होता. २४ एप्रिल २०२३ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ११५ धावांची भागीदारी केली होती.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर, सामना १ जून रोजी सुरू झाला आणि ३ जून रोजी संपला. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने पहिल्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात ५२४ धावा करून डाव घोषित केला.
त्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने ९ विकेट गमावत ३६२ धावा केल्या आणि इंग्लंडला ११ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने केवळ ४ चेंडूतच लक्ष्य गाठले.