आपापल्या लढती जिंकत उपांत्य फेरीत आगेकूच; जोकोव्हिच, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत; व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात
जेतेपदासाठी शर्यतीत असलेल्या अँडी मरे आणि गतविजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांनी आपापल्या लढती जिंकत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. उपांत्य फेरीत हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दरम्यान मंगळवारी उशिरा झालेल्या लढतींमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली.
बक्षीस रकमेद्वारे १०० दशलक्ष डॉलर्सची कमाई करण्याचा विक्रम नावावर करणारा जोकोव्हिच पहिला टेनिसपटू ठरला.
द्वितीय मानांकित मरेने रिचर्ड गॅस्क्वेटवर ५-७, ७-६ (७-३), ६-०, ६-२ असा विजय मिळवला. चौथ्यांदा मरेने फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी आतूर तृतीय मानांकित वॉवरिन्काने अल्बर्ट रामोस व्हिनोलसवर ६-२, ६-१, ७-६ (९-७) अशी मात केली. ११९८५ नंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा ३१ वर्षीय वॉवरिन्का सगळ्यात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अग्रमानांकित जोकोव्हिचने स्पेनच्या १४व्या मानांकित रॉबटरे बॉटिस्टा ऑगटवर ३-६, ६-४, ६-१, ७-५ असा विजय मिळवला. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्वासह खेळण्यासाठी प्रसिद्ध जोकोव्हिचने ऑगटविरुद्ध पहिला सेट गमावल्याने स्पर्धेत आणखी एक खळबळजनक निकाल लागणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र या धक्यातून सावरत जोकोव्हिचने पुढचे तिन्ही सेट नावावर करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयासह जोकोव्हिचने सलग २८व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या लढतीत जोकोव्हिचने एकाग्रता न गमावता बाजी मारली. कारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्याची जोकोव्हिचला सर्वोत्तम संधी आहे. पुढच्या लढतीत त्याची लढत बर्डीचशी होणार आहे.
अन्य लढतीत सातव्या मानांकित टॉमस बर्डीचने अकराव्या मानांकित डेव्हिड फेररवर ६-३, ७-५, ६-३ असा विजय मिळवला. डॉमिनिक थिइमने मार्केल ग्रॅनोलर्सवर ६-२, ६-७ (२-७), ६-१, ६-४ अशी मात केली. डेव्हिड गॉफीनने अर्नेस्ट गुलबिसचे आव्हान ४-६, ६-२, ६-२, ६-३ असे संपुष्टात आणले.
अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत अग्रणी असलेल्या सेरेना विल्यम्सने एलिना स्वितोलिनाचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. २२वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावत स्टेफी ग्राफच्या ग्रँड स्लॅम विक्रमांची बरोबरी करण्यासाठी सेरेना आतूर आहे. तिमेआ बॅझिनझस्कीने व्हीनस विल्यम्सवर ६-२, ६-४ अशी मात करत फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढच्या फेरीत तिचा मुकाबला किकी बर्टन्सशी होणार आहे. बर्टन्सने मॅडिसन की हिचा ७-६ (७-४), ६-३ असा पराभव केला. कझाकस्तानच्या युलिआ पुटिनसेव्हाने कार्ला सुआरेझ नवारोला ७-५, ७-५ असे नमवले.

बोपण्णा, पेस पराभूत
भारताच्या रोहन बोपण्णा आणि लिएण्डर पेस यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इव्हान डोडिग आणि मार्केलो मेलो जोडीने बोपण्णा-मर्गेआ जोडीवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. माइक आणि बॉब ब्रायन जोडीने पेस आणि मॅटकोव्हसकी जोडीवर ७-६ (१४-१२), ६-३ अशी मात केली.
सानिया उपांत्यपूर्व फेरीत
सानिया मिर्झाने इव्हान डोडिगच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जोडीने अ‍ॅलिझ कॉर्नेट आणि जोनाथन इयासरिक जोडीवर ६-७ (६-८), ६-४, १०-८ अशी मात केली. सानियाचे महिला दुहेरीतले आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.