IPL 2026 KKR Practice Match: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघही आपल्या काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणींचा सामना करत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी संघ कठोर मेहनत घेत आहे. यादरम्यान संघासाठी सराव सामन्यात संघासाठी आनंदाची बातमी मिळाली. संघाच्या २१ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळी केली.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने वादळी फटकेबाजी करत स्पर्धेपूर्वी आपले इरादे जाहीर केले आहेत. केकेआरचा संघ यंदाही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात अंगक्रिश रघुवंशीने शतक झळकावलं.
कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवार, २० मार्चला त्यांच्या घरच्या मैदानावर, ईडन गार्डन्सवर आपला पहिला सराव सामना खेळला. संपूर्ण संघाला गोल्ड नाइट्स आणि पर्पल नाइट्स अशा दोन वेगवेगळ्या संघांमध्ये विभागण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यात एक सामना खेळवण्यात आला. गोल्ड नाइट्सने प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. रिंकू सिंहने वेगवान ४० धावा केल्या, तर नवीन सलामीवीर टिम सेफर्टनेही ३० धावांची खेळी केली. युवा फलंदाज सार्थक रंजननेही फटकेबाजी करत ३७ धावा केल्या. पर्पल नाइट्सकडून कार्तिक त्यागीने तीन विकेट्स घेतल्या.
फिन ॲलनने पर्पल नाइट्स संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला. पण त्यानंतर, २१ वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने संघाचा डाव सावरला. रघुवंशीने सावध सुरुवात केली, पण नंतर वेग पकडत २९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. रघुवंशीने शानदार फलंदाजी करत पाहता पाहता ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.
रघुवंशीने २० व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं आणि संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. रघुवंशीने नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकत १८७ च्या स्ट्राईक रेटने वादळी १०३ धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे पर्पल नाइट्सला सहा गडी राखून विजय मिळवता आला. रघुवंशीच्या खेळीमुळे कोलकाताच्या फलंदाजीवरील काहीसा तणाव कमी झाला असावा. केल्या सीधनमध्येही मूळचा मुंबईचा असलेल्या रघुवंशीने कमालीच्या खेळी करत संघाचा डाव सावरला होता.
