कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) सध्या आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीत आहे, परंतु त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा सर्वाधिक धावा करणारा युवा फलंदाज स्पर्धेबाहेर झाला आहे. गेल्या सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून तो सामन्यात खेळताना दिसणार नाही.

केकेआरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी, दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. अंगक्रिश रघुवंशीला ही दुखापत मागच्या सामन्यादरम्यान झाली. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. २० मे रोजी ईडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंगक्रिश रघुवंशीला दुखापत झाली होती.

वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न करताना वरूण व त्याच्यात टक्कर झाली आणि त्यादरम्यान अंगक्रिशच्या डाव्या बोटाला दुखापत झाली. हा झेल टिपताना त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्या मानेत वेदना होऊ लागल्या. यामुळे त्याच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट मैदानात उतरला. यष्टीरक्षण आणि फलंदाजीची जबाबदारी सांभाळणाऱ्या तेजस्वी सिंग दहियाला बदली खेळाडू म्हणून तात्काळ मैदानात उतरवण्यात आलं.

कोलकाता नाईट रायडर्सने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अंगक्रिश रघुवंशीच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अंगक्रिश रघुवंशीच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे., “२० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न करताना डाव्या हाताचं बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे अंगक्रिश रघुवंशी २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर झाला आहे.”

आयपीएल २०२६ अंगक्रिश रघुवंशीसाठी एक संस्मरणीय हंगाम ठरला. त्याने १३ सामन्यांमध्ये ४२.२० च्या सरासरीने ४२२ धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो या हंगामात केकेआरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे, अंगक्रिश रघुवंशीची अनुपस्थिती संघासाठी एक मोठे नुकसान आहे.