Angkrish Raghuvanshi Fined LSG vs KKR: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला. अंगक्रिश रघुवंशी ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डमुळे बाद देण्यात आलं होतं. हे पाहून सर्वच जण अवाक् झाले, अंगक्रिश रघुवंशीदेखील पंचांशी हुज्जत घालत होता आणि अभिषेक नायरदेखील चौथ्या पंचांशी वाद घालताना दिसला. या सर्व प्रकरणानंतर अंगक्रिश रघुवंशी चर्चेत असताना त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पहिल्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रघुवंशी हलक्या हाताने खेळलेल्या फटक्यानंतर धाव घेण्यासाठी धावू लागला. तितक्यात ग्रीनने त्याला पुन्हा क्रीजवर जाण्याचा इशारा केला. त्यानंतर मागे परतताना रघुवंशी वेगळ्या अँगलमध्ये धावला. ज्यामुळे स्टंपच्या दिशेने फेकलेला चेंडू त्याच्या शरीराला लागला. यामुळे मोहम्मद शमी ऋषभ पंत यांनी ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डसाठी अपील केलं. तिसऱ्या पंचांनीही व्हीडिओ पाहिल्यानंतर तो चेंडूच्या मध्ये आल्याचं सांगत त्याला बाद दिलं.

अंगक्रिश रघुवंशी बाद दिल्यानंतर पंचांशी चर्चा करताना दिसला. पंचांनी त्याला समजावत मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. मैदानाबाहेर जात असताना रघुवंशीने रागात बॅट बाऊंड्री रोपवर मारली आणि हेल्मेट फेकून देत आपला संताप व्यक्त केला. याचाच फटका आता त्याला बसला आहे.

आयपीएल निवेदनात म्हटलं आहे की, कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आणि यष्टिरक्षक अंगक्रिश रघुवंशी याच्यावर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात (मॅच क्र. ३८) आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के दंड आकारण्यात आला असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

अंगक्रिश रघुवंशीला दंड का ठोठावण्यात आला?

रघुवंशीने आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम २.२ चे उल्लंघन केल्याचे आढळले. हे कलम सामन्यादरम्यान क्रिकेट साहित्य, कपडे, मैदानावरील उपकरणे किंवा इतर वस्तूंशी गैरवर्तन करण्यासंदर्भात आहे. ही घटना पाचव्या षटकात घडली. ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’मुळे बाद ठरल्यानंतर रघुवंशीने रागाच्या भरात बॅटने बाउंड्री कुशनवर जोरात मारलं आणि त्यानंतर हेल्मेटही संतापाने डगआउटकडे फेकलं. रघुवंशीने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.