Anil Kumble On Mumbai Indians Defeat: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३ पैकी २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये मुंबई सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध पार पडला. पावसाने हजेरी लावल्याने हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १५१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थान रॉयल्सने हा सामना २७ धावांनी आपल्या नावावर केला.
हा सामना पावसामुळे उशिराने सुरु झाला होता. त्यामुळे ११-११ षटकांचा सामना खेळवण्यात आला. यशस्वी जैस्वालचया दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने ११ षटकांअखेर १५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अनिल कुंबळे यांनी जियो स्टारवर बोलताना मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण सांगितलं. त्यांच्या मते, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीमध्ये ध्येय आणि जिद्दीची कमतरता असल्याचं जाणवलं. याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर जाणवला. ११ षटकात १५१ धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसतं, असं अनिल कुंबळे यांचं म्हणणं आहे.
अनिल कुंबळे म्हणाले, “जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. वैभवने बुमराहची गोलंदाजी सहजरित्या खेळून काढली. त्याने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतरही तो बुमराहवर भारी पडला. आपण नेहमीच बुमराहला फलंदाजांवर भारी पडताना पाहिलं आहे. पण इथे वैभवने बुमराहला स्लो चेंडू टाकायला भाग पाडलं.”
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने ३९ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. कर्णधार रियान परागने २० धावा केल्या. यासह राजस्थानने ११ षटकांअखेर १५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून शेरफेन रुदरफोर्डने २५ आणि नमन धीरने २५ धावांची खेळी केली. मुंबईला ११ षटकांअखेर ९ गडी बाद १२३ धावा करता आल्या.
