scorecardresearch

‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धा : अंकिता-ऋतुजा जोडी दुहेरीत अजिंक्य

मागील आठवडय़ात याच ठिकाणी झालेल्या अन्य एका स्पर्धेची अंकित-ऋतुजा जोडीने उपांत्य फेरी गाठली होती.

बेंडिगो (ऑस्ट्रेलिया) : अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियातील बेंडिगो शहरात झालेल्या महिलांच्या ‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात अंकिता-ऋतुजा या पुणेकर जोडीने अलेक्झांड्रा बोझोव्हिच (ऑस्ट्रेलिया) आणि वेरॉनिका फाल्कोवस्का (पोलंड) या जोडीला ४-६, ६-३, १०-४ असे नमवले. मागील आठवडय़ात याच ठिकाणी झालेल्या अन्य एका स्पर्धेची अंकित-ऋतुजा जोडीने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कामगिरीत अधिक सुधारणा करत जेतेपदाला गवसणी घातली.

‘‘मी याआधी अंकितासोबत दोन स्पर्धामध्ये खेळले. त्यावेळी एकत्रित आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. मात्र, सामन्यागणिक आमच्या खेळात आणि संवादात सुधारणा होत गेली. त्यामुळेच आम्हाला ही स्पर्धा जिंकणे शक्य झाले,’’ असे ऋतुजाने नमूद केले. अंतिम सामन्यात अंकित-ऋतुजा जोडीने पहिला सेट ४-६ असा गमावला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना त्यांनी ६-३ अशी बाजी मारली. मग सुपर टायब्रेकरमध्ये भारतीय जोडीच्या आक्रमक खेळापुढे बोझोव्हिच-फाल्कोवस्का जोडी निष्प्रभ ठरली. ‘‘पहिल्या सेटमध्ये आम्ही काही चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्येही २-२ अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर आम्हाला खेळ उंचावण्यात यश आले,’’ असे अंकिता म्हणाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ankita rutuja win itf tennis double title in bendigo zws

ताज्या बातम्या