राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय पोस्टर गर्ल मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले. सध्या गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ हंगाम खेळला जात आहेत. त्यात भारताच्या लेकींनी चमकदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी, ३० सप्टेंबर वेटलिफ्टिंग पासून ते हळू पळण्याच्या शर्यती (रेस वॉक) पर्यंत भारतीय महिलांनी जबरदस्त प्रदर्शन करत पदके जिंकली. नेमबाजीमध्ये काही अप्रतिम सामने पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने शुक्रवारी ३६व्या राष्ट्रीय क्रीडा २०२२ मध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात १९१ किलोचा भार उचलून ही किमया साधली. ऑगस्ट २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये ८४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०७ किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे मीराबाई ही तिच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. विशेष बाब म्हणजे दुखापतीतून सावरत मीराबाई चानूने सुवर्ण भार उचलला आहे.

मीराबाई चानूने व्यक्त केल्या भावना

“शक्य होते, पण मला मणिपूरचे प्रतिनिधित्व करायचे होते. मणिपूरला पहिले सुवर्णपदक मिळवून द्यायचे होते. राष्ट्रीय स्पर्धेतील माझेदेखील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राष्ट्रीय स्पर्धेतून मला माझा आत्मविश्वास उंचवायचा होता. सध्या माझी तंदुरुस्ती कशी आहे, हे पडताळून पाहायचे होते. माझा खेळ कसा होतो आणखी कुठल्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे, यावर मला लक्ष केंद्रित करायचे होते.” पदक जिंकल्यानंतर तिने भावना व्यक्त केल्या.

मीराबाई चानूने सुवर्ण कामगिरी केल्यानंतर म्हटले, “अलीकडेच एन. आय. एस. पटियाला येथे प्रशिक्षणादरम्यान माझ्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती, त्यानंतर मी जास्त धोका पत्करणार नाही, असे ठरवले. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा देखील डिसेंबरमध्ये होणार आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि आनंद गगनात न मावणारा आहे. जेव्हा मला उद्घाटन समारंभात दलाचे नेतृत्व करण्यास सांगितले गेले तेव्हा माझा उत्साह अनेक पटीने वाढला. खरं तर उद्घाटन समारंभास उपस्थित राहणे सहसा खूप व्यस्त असते कारण माझ्या स्पर्धा दुसऱ्या दिवशी लवकर सुरू होतात.”

तसेच २० किमी रेस वॉकमध्ये उत्तर प्रदेशची मुनिता प्रजापती हिने सुवर्ण पदक जिंकले आहे.  या युवा खेळाडूची घरची परिस्थिती अतिशय सामान्य आहे. तिचे वडील मजदूर आहेत. पण एवढ्या सगळ्या समस्या असताना देखील या युवा खेळाडूने सुवर्ण पदक नावावर केले. पुरुषांच्या २० किमी रेस वॉकमध्ये सर्विसेसचा देवंद्र सिंग याने सुवर्ण पदक जिंकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another gold by mirabai chanu achieved set a new record in the national competition avw
First published on: 01-10-2022 at 15:00 IST