Anshul Kamboj Duplicate: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जोसेफ विजय यांनी काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शपथविधीला झालेली प्रचंड गर्दी, जोसेफ विजय यांचं ते भाषण या सर्व गोष्टी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिल्या. पण त्याहून जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे, शपथविधीच्या वेळी जोसेफ विजय यांच्या मागे असलेला अधिकारी. हा अधिकारी भारताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग असलेल्या अंशूल कंबोजसारखा दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, आता चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

कंबोजने घेतली ड्युप्लिकेट अंशूलची भेट..

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या मागे एक पोलिस अधिकारी दिसून आला. जो हुबेहूब अंशूल कंबोजसारखा दिसून येत होता. शपथविधी झाल्यानंतर या पोलिस अधिकाऱ्याचे आणि अंशूल कंबोजचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून या अधिकाऱ्याला चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर येण्याचं आमंत्रण देण्यात आलं. अंशूल कंबोजने त्या पोलिस अधिकाऱ्याची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. दोघांनी एकत्र फोटो क्लिक केला. या भेटीचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेत अंशूल कंबोजचा बोलबाला

अंशूल कंबोजने आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून १९.२१ च्या सरासरीने १९ फलंदाजांना बाद केलं आहे. त्याने पर्पल कॅपवरही कब्जा केला होता. पण भुवनेश्वर कुमारने त्याच्याकडून ऑरेंज कॅप हिसकावली आहे. पण तुमच्याकडे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असणार आहे.

चेन्नईकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी!

चेन्नई सुपर किंग्स संघाला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण लागोपाठ विजय मिळवून चेन्नईने प्लेऑफची वाट धरली आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. तर केवळ ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. १२ गुणांसह चेन्नईचा संघ पाचव्या स्थानी आहे.