CSK vs RCB Turning Point: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतही दमदार फॉर्ममध्ये आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्ज संघाा सळो की पळो करुन सोडलं. टीम डेव्हिड आणि रजत पाटीदारच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या डावात २५० धावांचा डोंगर उभारला.
या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा डाव २०७ धावांवर आटोपला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान पहिल्या डावात केलेली एक चूक चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगलीच महागात पडली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड या विजयाचा हिरो ठरला. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने २५ चेंडूत ७० धावांची वादळी खेळी केली. पण ज्यावेळी तो २८ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी तो बाद झाला होता. अंशूल कंबोजने त्याला बाद केलं होतं. पण नेमकी तेव्हाच अशी चूक झाली, जी चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगलीच महागात पडली.
नेमकं काय घडलं?
ज्यावेळी टीम डेव्हिड २८ धावांवर फलंदाजी करत होता त्यावेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७.४ षटकात १९९ धावा केल्या होत्या. अंशुल कंबोजने भन्नाट चेंडू टाकून त्याला त्रिफळाचित केलं. टीम डेव्हिड बाद झाल्यामुळे अंशुल कंबोजचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा आनंद ५ सेकंदापुर्ती मर्यादित राहिला. कारण सायरन वाजला आणि अंपायरने हा चेंडू नो चेंडू म्हणून घोषित केला.
टीम डेव्हिडला २८ धावांवर जीवदान मिळालं. यासह फ्री हिटवर टीम डेव्हिडने खणखणीत षटकार मारून सीएसकेच्या जखमेवर मीठ चोळलं. हे जीवदान मिळाल्यानंतर टीम डेव्हिडने चौकार षटकारांचा पाऊस पाडला आणि संघाची धावसंख्या २५० पर्यंत पोहोचवली.
