एपी, न्यूयॉर्क : नोव्हाक जोकोव्हिच सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळू शकणार नाही. करोनाची लस न घेतल्यामुळे त्याला अमेरिकेत प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली आहे. जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांतील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे गुरुवारी ‘ट्विटर’द्वारे स्पष्ट केले आहे. ‘‘यंदा अमेरिकन टेनिस स्पर्धेसाठी अमेरिकेला मी जाऊ शकणार नसल्यामुळे मला दु:ख वाटत आहे. मी सकारात्मक पद्धतीने खेळाकडे पाहतो आहे. या स्पर्धेत पुन्हा खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे,’’ असे जोकोव्हिचने म्हटले आहे.

सर्बियाच्या ३५ वर्षीय जोकोव्हिचने पुरुष एकेरीत २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. फक्त राफेल नदालच्या खात्यावर जोकोव्हिचपेक्षा एक अधिक म्हणजेच २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत. जोकोव्हिचने २०११, २०१५ आणि २०१८मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. याचप्रमाणे सहा वेळा त्याला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

करोना लसीकरण न झालेल्या परदेशी नागरिकांना अमेरिका आणि कॅनडात प्रवेश दिला जात नाही. काही स्पर्धामध्ये खेळू दिले नाही तरी चालेल; परंतु करोनाची लस घेणार नाही, अशी भूमिका जोकोव्हिचने घेतली आहे. अमेरिकन टेनिस संघटनेने यंदाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी सरकारचे नियम बंधनकारक असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

युकीची आगेकूच; रामनाथन, नागल पराभूत

भारताचा टेनिसपटू युकी भांब्रीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत माल्डोव्हाच्या राडू अ‍ॅल्बोटला चुरशीच्या लढतीत पराभूत करत पुरुष एकेरी गटात आगेकूच केली.  भारताचा सर्वोत्तम क्रमवारी असलेला एकेरी टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांना त्यांच्या पात्रता सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे मुख्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. जागतिक क्रमवारीत २४१व्या स्थानी असलेल्या रामकुमारने अमेरिकेच्या ब्रुनो कुझुहारकडून ३-६, ५-७ अशी हार पत्करली, तर कॅनडाच्या वासेक पोसपिसिलने नागलला ७-६, ६-४ असे पराभूत केले. क्रमवारीत ५५२व्या स्थानावर असलेल्या युकीने आपल्याहून चांगली क्रमवारी असलेल्या अ‍ॅल्बोटवर (१०७व्या स्थानी) ७-६ (७-४), ६-४ असा विजय मिळवला.