अन्वय सावंत

मुंबई : मुंबईतील ‘मैदान क्रिकेट’ने भारताला अनेक खेळाडू मिळवून दिले. मात्र एखादा परदेशी खेळाडू क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी आणि आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी मुंबईत आल्याचे क्वचितच ऐकायला मिळते. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीचा मुलगा थांडोने हा पर्याय निवडला आहे. केवळ मुंबईच नाही, तर तंत्रज्ञानाधारित क्रिकेट सरावासाठी त्याने थेट पालघर जिल्ह्यातील सफाळा गाठले.

डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या थांडोने २०१८च्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही समाधानकारक कामगिरी केली आहे. परंतु आता खेळात अधिक सातत्य आणि वैविध्य आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक हंगाम संपल्यावर त्याने मायदेशाऐवजी मुंबईत नामांकित क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. लाड यांनी सुरुवातीचे काही दिवस थांडोला मुंबईतील विविध मैदानांवर प्रशिक्षण दिले. त्यानंतर दोन दिवसांकरिता (१४ आणि १५ मे) त्यांनी थांडोसह सफाळा येथील ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिटय़ूट या आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान असलेल्या अकादमीमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला.

‘‘आमच्याकडे इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे लाड यांनी थांडोला घेऊन सरावासाठी अकादमीत येण्याबाबत आम्हाला विचारणा केली आणि आम्ही होकार दिला,’’ असे ओमटेक्स इन्स्टिटय़ूटचे संचालक उन्मेश कुलकर्णी म्हणाले. ‘‘आमची इनडोअर क्रिकेट सुविधा ही आशियातील सर्वात मोठी आहे. तेथील ११ पैकी एका खेळपट्टीवर ‘पिच व्हिजन’ हे तंत्रज्ञान आहे. खेळपट्टीच्या खाली आणि मागील पडद्यांमध्ये सेन्सर्स असून या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे फलंदाज व गोलंदाजाची तांत्रिक माहिती तयार होते. त्यातून गोलंदाजीची शैली, चेंडूची गती, कोणत्या ठिकाणी चेंडूचा टप्पा हे कळते. या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी लाड यांनी थांडोचा आमच्या अकादमीत सराव घेतला,’’ अशी माहिती मुंबईचे माजी रणजीपटू आणि ओमटेक्स इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी प्रमुख राजेश सुतार यांनी दिली.

२१ वर्षीय थांडोने आतापर्यंत १४ प्रथम श्रेणी सामन्यांत १९४ धावा करतानाच ३२ बळी मिळवले आहेत. तसेच त्याने १७ एकदिवसीय सामने (११७ धावा आणि २१ बळी) व १४ ट्वेन्टी-२० सामनेही (११ धावा आणि १६ बळी) खेळले आहेत.