Anushka Sharma Reaction On Virat Kohli No Look Six: आयपीएल २०२६ स्पर्धेत विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विराटने अर्धशतक झळकावून दमदार सुरुवात केली होती. रविवारी (५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो १८ चेंडूत २८ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला. हा षटकार मारल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने दिलेल्या रिॲक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली होती. यादरम्यान त्याने मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार ‘नो लुक षटकार’ खेचला. हा षटकार पाहून स्टँड्समध्ये असलेल्या अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू फुललं. विराटने हा षटकार मारल्यानंतर कॅमेरामनने कॅमेरा अनुष्का शर्माकडे फिरवला. तिच्या या रिॲक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यापद्धतीने सुरुवात झाली होती त्यावरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २५० धावांचा डोंगर उभारणार असं मुळीच वाटलं नव्हतं. कारण फिल सॉल्ट ४६ धावांवर बाद झाला. तर विराट कोहली २८ धावांवर माघारी परतला. देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने नाबाद ४८ धावा केल्या. तर टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ३ गडी बाद २५० धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन अवघ्या ९, ऋतुराज गायकवाड ७, आयुष म्हात्रे १ धावांवर माघारी परतले. तर सर्फराज खानने ५० धावांची खेळी केली. तर कार्तिक शर्माने ६ धावा केल्या. शेवटी प्रशांत वीरने ४३ आणि जेमी ओव्हरटनने ३७ धावा केल्या. पण चेन्नईचा डाव २०७ धावांवर आटोपला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला. हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या हंगामातील सलग तिसरा पराभव होता. तर बंगळुरूचा सलग दुसरा विजय होता.
