Rahul Dravid Son’s Anvay Dravid Batting: भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने अनेक वर्ष भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली. आता त्याचा लेक अन्वय द्रविड देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विशाखापट्टणममध्ये विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना १७ वर्षीय अन्वय द्रविडने गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात १०० चेंडूंमध्ये १५१ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २० चौकार आणि ३ षटकार खेचले. कर्नाटकचा संघ ३५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण अन्वयच्या खेळीच्या बळावर कर्नाटकने एकहाती विजय मिळवला.

या सामन्यातील दोन्ही डावात फलंदाजी करताना फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या गुजरातला अवघ्य १९ धावांवर पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर वेद पटेल आणि शौर्य पंचोलीने मिळून गुजरातचा डाव सावरला. त्यानंतर समीर भंडारी आणि कुश पटेलने चौथ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी यश पंजवानी आणि समीर भंडारीने २१७ धावांची विक्रमी भागीदारी केली.

कर्नाटकला हा सामना जिंकण्यासाठी ३५७ धावांचा पाठलाग करायचा होता. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकलाही हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीला आलेल्या नितीश आर्य आणि रोहित रेड्डीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ३० धावा जोडल्या. सुरूवातीलाच मोठे धक्के बसल्यानंतर कर्णधार अन्वय द्रविडने संघाचा डाव सावरला. त्याने ध्रुव कृष्णसोबत मिळून गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर कर्नाटकचा विजय जवळजवळ निश्चित झाला.

त्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांना ध्रुव कृ्ष्णला बाद करण्यात यश आलं. पण अन्वय द्रविड अजूनही खेळपट्टीवर टिकून होता. त्याने अनिकेत रेड्डीसोबत मिळून ६१ धावांची भागीदारी केली. संघाला विजयाच्या जवळ पोहचवल्यानंतर अन्वय द्रविड १५१ धावांची खेळी करून माघारी परतला. पण कर्नाटकचा विजय निश्चित झाला होता. कर्नाटकने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. याआधी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यातही अन्वयने अवघ्या ४१ चेंडूंमध्ये ८५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली होती.