Rahul Dravid Son Anvay inning in IND U19 vs SL U19: राहुल द्रविड हे क्रिकेटच्या मैदानात अनेकदा टीम इंडियाचे ‘तारणहार’ आणि खऱ्या अर्थाने एक अभेद्य ‘भिंत’ राहिले होते आणि या भूमिकेसाठी त्यांचं नेहमीच उदाहरण दिलं जातं. मात्र, आता त्यांचा धाकटा मुलगा अन्वयही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. ६ जुलैला श्रीलंका ‘अंडर-१९’ संघाविरुद्धच्या सामन्यातील अन्वय द्रविडची खेळी पाहिल्यानंतर द्रविड पर्वाला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही. संघ अडचणीत असताना अन्वय द्रविड जणू भिंतीसारखा संघासाठी उभा राहिला आणि त्याने ८७ धावांची उत्कृष्ट खेळी केली.
भारत अंडर आणि श्रीलंका अंडर-१९ यांच्याती सामन्यात अन्वयने त्याच्या अंडर-१९ कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी साकारली आणि तीही अशा निर्णायक क्षणी, जेव्हा संघाला त्या खेळीची सर्वाधिक गरज होती.
हंबनटोटा येथे श्रीलंका अंडर-१९ संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारत अंडर-१९ संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय संघाच्या अंगलट आला; कारण संघाची धावसंख्या १०० धावांपर्यंत पोहोचण्याआधीच संघाचे प्रमुख चार फलंदाज बाद झाले. यादरम्यान मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या अन्वय द्रविडने केवळ वेगवान खेळीच केली नाही, तर अर्जुन राजपूतसोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारीही रचली.
अन्वय द्रविडने अर्जुन राजपूतसोबत पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे भारत अंडर-१९ संघाची धावसंख्या ४ बाद ८१ वरून ५ बाद २२६ पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अर्जुन राजपूत ७६ धावा करून धावबाद (रन आऊट) झाल्याने ही भागीदारी तुटली.
अर्जुन राजपूतसोबतच्या भागीदारीदरम्यान अन्वय द्रविडने त्याच्या ‘अंडर-१९’ कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने अवघ्या ४७ चेंडूंत हे पहिलं ‘अंडर-१९’ अर्धशतक पूर्ण केलं; या खेळीत चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, अन्वय आपल्या अर्धशतकाचं शतकात रूपांतर करू शकला नाही; ६७ चेंडूंत ८७ धावा करत तो बाद झाला. ही त्याची ‘अंडर-१९’ कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
अर्धशतकी खेळी साकारल्यानंतरही अन्वय द्रविडने आपली संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळी कायम ठेवली. आव्हानात्मक परिस्थितीत खेळलेल्या या प्रभावी खेळीतून त्याने हे स्पष्टपणे सिद्ध केलं की, आपल्या वडिलांप्रमाणेच त्याच्याकडेही संघासाठी अभेद्य भिंत बनण्याची क्षमता आहे. श्रीलंकेच्या याच दौऱ्यावर अन्वय द्रविडने अंडर-१९ एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केलं होतं; मात्र दौऱ्यातील पहिल्या सामन्यात त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या.
