मुंबई : महाराष्ट्रातील चिंचवडच्या अन्वी हिंगेने जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर मोठी झेप घेताना वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ‘महिला कँडिडेट्स मास्टर’ (डब्ल्यूसीएम) किताब पटकावला. या किताबाची सर्वांत युवा मानकरी ठरण्याचा मान तिने मिळवला आहे.

गेल्या महिन्यात स्पेनमधील ॲलिकांटे येथील प्रतिष्ठेच्या ‘एक्स’ स्पर्धेत अन्वीने ९ फेर्यांत ६.५ गुण मिळवले आणि या कामगिरीच्या जोरावर रेटिंगमध्ये ती थेट एलो १८०० गुणांच्याही पुढे गेली. स्पर्धेत ती एकूण संयुक्त चौथ्या क्रमांकावर राहिली. परंतु महिलांच्या गटात ती विजेती ठरली आणि जगातील सर्वांत युवा ‘डब्ल्यूसीएम’ बनली. यासह तिने ९ वर्षांखालील गटाच्या क्रमवारीत अग्रस्थानही पटकावले.

अन्वीने अतिशय लहान वयातच उल्लेखनीय यश मिळवले आहे. सात वर्षांखालील गटात राज्य विजेती, राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक विजेती अशी तिची कामगिरी आहे. २०२५ मध्ये ग्रीसमध्ये झालेल्या ‘फिडे वर्ल्ड कॅडेट अँड यूथ’ स्पर्धेत तिने आठ वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकले. तसेच मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेतही ती उपविजेती ठरली. गतवर्षी ताजिकिस्तान येथे झालेल्या पश्चिम आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने दोन सुवर्ण आणि चार रौप्यपदके पटकावली होती.

साडेचार वर्षांची असताना अन्वीला वडिलांनी पुण्यातील टॅक्टिकल मूव्हज बुद्धिबळ अकादमीमध्ये दाखल केले. सध्या ती ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि फिडे मास्टर सिद्धांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.