ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने टी -२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन दावेदार संघांची नावे सांगितली आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी अनेक देशांच्या खेळाडू कडून मत-मतांतरे नोंदवली जात आहेत. दरम्यान, फिरकीपटू शेन वॉर्नने देखील दोन प्रबळ दावेदार संघांची नावे सांगितले आहेत. शेन वॉर्नचा असा विश्वास आहे की भारत आणि इंग्लंड सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी -२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. भारत २४ ऑक्टोबरला दुबईत पाकिस्तानविरुद्ध टी -२० विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करेल, तर इंग्लंड २३ ऑक्टोबरला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळेल.

शेन वॉर्नने असेही सांगितले आहे की भारत आणि इंग्लंड व्यतिरिक्त असे संघ आहेत ज्यांना कमी लेखता येणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाला कमी लेखले जात आहे. प्रत्येकाला हे माहित असले पाहिजे की कांगारू संघात बरेच मॅच जिंकणारे खेळाडू आहेत. शेन वॉर्नने ट्वीट केले, “मला वाटते की इंग्लंड आणि भारत टी -२० विश्वचषकासाठी दावेदार असतील. न्यूझीलंड देखील नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करते. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज देखील आहेत. कोण जिंकते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

भारताविरोधातील सामन्याआधी इंझमामचं मोठं विधान

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचंही इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. भारताने दुसऱ्या सराव सामन्यातही मिळवलेल्या विजयानंतर इंझमामन हे वक्तव्य केलं आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यातही भारताने सहजपणे ऑस्ट्रेलियावर मात केली.

“आशियाई खेळपट्ट्यांवर भारतीय संघ टी-२० मधील सर्वात धोकादायक संघ असून त्यांना नमवणं अशक्य आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाविरोधात सामना पाहिलात तर त्यांनी अत्यंत सहजपणे १५५ धावा करत विजय मिळवला. विराट कोहलीने तर फलंदाजीही नाही केली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरोधात त्यांना कोणतीही अडचण जाणवली नाही,” असं सांगत इंझमामने कौतुक केलं आहे.“स्पर्धेदरम्यान एखादा संघ जिंकेल असं तुम्ही कधीच सांगू शकत नाही. हा संधींचा भाग आहे. मापण माझ्या मते अमिराती येथील सध्याच्या स्थितीत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे,” असं इंझमामने म्हटलं आहे.