गॉल : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिल्यास एकेदिवशी भारतीय संघात निवड होणार याची खात्री होतीच. मी विश्वास कधीही गमावला नाही. मेहनत घेत राहिलो आणि अखेर राष्ट्रीय संघाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेच, असे वक्तव्य वेगवान गोलंदाज अकिब नबीने केले.

अकिबने गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने सातत्याने बळी मिळवले आणि अखेर त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर अकिबला भारतीय संघात स्थान मिळाले.

भारतीय संघात निवड झाल्याचे समजले, तेव्हा अकिब बंगळूरुला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (सीओई) होणार्‍या शिबिरासाठी तो निघणार होता. त्याच वेळी त्याला फोन आला आणि कुठे आहेस, अशी विचारणा झाली. बंगळूरुला जाण्यासाठी विमानतळावर असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याला, ‘बंगळूरुला जाण्याची गरज नाही, तुला श्रीलंकेला यायचे आहे. तुझी कसोटी संघात निवड झाली आहे,’ असे सांगण्यात आले.

‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत अकिबने हा किस्सा भारतीय संघातील सहकारी सारांश जैनला सांगितला. ‘‘सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही. संघ आधीच जाहीर झाला होता. त्यामुळे अशी काही अपेक्षा नव्हती. मी तर ‘सीओई’मधील शिबिरात जाऊन मेहनत करण्याचा विचार करत होतो. अचानक मला श्रीलंकेला जाण्यासाठी फोन आला,’’ असे अकिबने सांगितले.

संघाची घोषणा झाल्यानंतरही अकिबने आशा सोडली नव्हती. गेल्या काही वर्षांतील आपल्या कामगिरीच्या जोरावर एक ना एक दिवस भारतीय संघाचे दार उघडेल, असा त्याला विश्वास होता. ‘‘हो, मला अपेक्षा होती. मात्र, क्रिकेटपटू म्हणून आपले काम फक्त चांगली कामगिरी करणे असते. कधीतरी मला संधी मिळेल, असा विश्वास होता. तुम्ही अनेक वर्षे चांगली कामगिरी करत असाल, तर तुमच्या मेहनतीचे फळ मिळायलाच हवे,’’ असे तो म्हणाला. ‘‘मी नेहमी बळी मिळवण्याच्या आणि चांगली कामगिरी करण्याच्या विचारानेच गोलंदाजी करतो. आता माझी भारतीय संघात निवड झाली आहे, याचा खूप आनंद आहे. माझे कुटुंबही खूप आनंदी आहे. माझ्यासाठी यापेक्षा मोठा क्षण असू शकत नाही,’’ असेही नकिबने नमूद केले.