ऑक्टोबर महिन्यात क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत-पाक सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. बांगलादेशमध्ये रंगणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत, पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ११ ऑक्टोबरपासून बांगलादेशची राजधानी ढाका येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

यंदाच्या आशिया चषकाचं हे दहावं वर्ष असणार आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेला भारताला या स्पर्धेत पहिलं मानांकन मिळालेलं आहे. एकूण ८ देश या स्पर्धेत सहभागी होणार असून, भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी हा सामना रंगणार आहे.

अवश्य वाचा – नेदरलँड्सला नमवून भारताचा मालिकाविजय

याआधी वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनवेळा पराभवाचा धक्का दिला आहे. आतापर्यंतच्या इतिहासाची नोंद घ्यायची झाली तर पाकिस्तानने भारतापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या काही सामन्यांमधला पाकिस्तान संघाचा फॉर्म पाहता या स्पर्धेत भारताचं पारडं जड मानलं जात आहे. याआधी भारताने दोनवेळा हॉकीच्या आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. २००३ आणि २००७ साली भारताने या स्पर्धेचा विजेता ठरला होता. आशिया चषक विजेत्या संघाला हॉकीच्या विश्वचषकात थेट प्रवेश मिळतो, त्यामुळे ही स्पर्धा जिंकून विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्याचा पाकिस्तानी संघाचा मानस असणार आहे.