Argentina vs England, FIFA World Cup Semi Final: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा थरार गतविजेत्या अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना पार पडला. पण शेवटी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने पुन्हा एकदा इतिहास घडवला आणि फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. हा सामना अर्जेंटिनाने २-१ ने आपल्या नावावर केला. फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन संघाविरुद्ध होणार आहे.

या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पण त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडकडून गॉर्डनने ५५ व्या मिनिटाला गोल केला आणि इंग्लंडला १-० ने आघाडी मिळवून दिली. पण अर्जेंटिनाचा संघ आपल्या कमबॅकसाठी ओळखला जातो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. सामन्यातील ८५ व्या मिनिटापर्यंत इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर होता. पण शेवटी ८५ व्या मिनिटाला फर्नेंडाजने पहिला गोल केला आणि स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला. त्यानंतर ९२ व्या मिनिटाला मार्टिनेजने निर्णायक गोल केला आणि अर्जेंटिनाला हा सामना २-१ ने जिंकून दिला.

पहिल्या हाफमध्ये अटीतटीची लढत

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी विरोधी संघाचा गोल होऊ नये म्हणून पूर्ण जोर लावला. प्रत्येक डावखेच हाणून पाडले. सामन्यातील सुरुवातीच्या २५ मिनिटांत इंग्लंडची पकड मजबूत होती. इंग्लंडकडून अँथनी गॉर्डन, डेजेड स्पेंस आणि रिस जेम्स यांना एकापाठोपाठ एक हल्ले चढवले. पण अर्जेंटिनाच्या बचावपटूंनी यशस्वी बचाव केला. पहिल्या हाफमध्ये २३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण अर्जेंटिनाचा संघ या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. इंग्लंडकडून गॉर्डनने ५५ व्या मिनिटाला या सामन्यातील पहिला गोल केला.

फायनलमध्ये स्पेनसोबत भिडणार

पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या अर्जेंटिनाने दुसऱ्या हाफमध्ये दमदार पुनरागमन केलं. शेवटची काही मिनिटे शिल्लक असतानाही सामना जिंकता येऊ शकतो, हे अर्जेंटिनाने दाखवून दिलं. या सामन्यात मेस्सी एकही गोल करू शकला नाही. तर फर्नेंडाज आणि मार्टिनेज हे विजयाचे हिरो ठरले. या विजयासह अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने तब्बल २८ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचा पराभव केला आहे. आता फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेनविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून अर्जेंटिनाचा संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.