टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकची प्रथमच उपांत्य फेरी गाठून भारतीय महिला संघाने आधीच इतिहास घडवला आहे. आता बुधवारी अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे ‘सुवर्णलक्ष्य’ महिला संघापुढे आहे. १८ निर्भीड महिला हॉकीपटूंनी सोमवारी तीन वेळा ऑलिम्पिक विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असा अनपेक्षित धक्का दिला. सामन्याच्या २२व्या मिनिटाला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरने गोलमध्ये रूपांतर करीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने पदार्पणात सहा संघांपैकी चौथे स्थान मिळवले होते. त्यानंतरची ही सर्वोत्तम कामगिरी भारताने साकारली आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारताच्या बचावाची भिस्त गोलरक्षक सविता पुनियासह गुर्जित, दीप ग्रेस इक्का, मोनिका आणि उदिता यांच्यावर आहे.