Argentina coach Lionel Scaloni breaks down in press conference: अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांना फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संघाच्या पराभवाबद्दल बोलताना त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. विश्वचषकाची ट्रॉफी हातातून निसटल्याची जाणीव होताच स्कालोनी यांचे डोळे पाणावले आणि ते भावूक झाले. स्कालोनी यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

चार वर्षांपूर्वी स्कालोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला होता. यंदाही त्यांनी संघाला न्यू जर्सी येथे झालेल्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून देत विजेतेपद कायम राखण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसने केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनने १-० असा विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलं. या पराभवामुळे अर्जेंटिनाचं विश्वविजेतेपद संपुष्टात आलं, तसेच लिओनेल मेस्सीला सलग दोन विश्वचषक जिंकत स्पर्धेला निरोप देण्याचं स्वप्नही अपूर्ण राहिलं.

या पराभवासह अर्जेंटिनाच्या अत्यंत खडतर विश्वचषक मोहिमेचा शेवट झाला. स्पर्धेदरम्यान संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतींनी त्रस्त होते, त्यामुळे बाद फेरीत स्कालोनी यांना संघात अनेक बदल करावे लागले. अंतिम सामन्यातील हा पराभव बराच काळ मनाला सलत राहील, याची कबुली त्यांनी दिली. मात्र, इतक्या अडचणींनंतरही संघाने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, त्यामुळे आपल्या खेळाडूंकडून यापेक्षा अधिक काही अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्कालोनी यांनी यावेळी लिओनेल मेस्सीचंही भरभरून कौतुक केलं. ३९ वर्षीय मेस्सी हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडू असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, अंतिम सामन्यातील पराभवापेक्षा संपूर्ण स्पर्धेत अर्जेंटिनाने केलेल्या उल्लेखनीय प्रवासाचीच देशवासीयांनी आठवण ठेवावी, अशी भावनिक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘हा पराभव आमच्या मनाला चटका लावणारा’ – अर्जेंटिनाचे प्रशिक्षक

अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना लिओनेल स्कालोनी प्रचंड भावूक झाले. संपूर्ण विश्वचषक मोहिमेदरम्यान दुखापतींमुळे अर्जेंटिनाच्या संघाला मोठा फटका बसला आणि त्यामुळे सातत्याने संघात बदल करावे लागल्याचं त्यांनी सांगितलं. “संघातील महत्त्वाच्या स्थानांवरील खेळाडूंना अनपेक्षित दुखापती झाल्या. या संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंवर प्रचंड शारीरिक ताण आला होता. तरीही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वस्व पणाला लावलं. माझ्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने लढा दिला, त्याचा मला अभिमान आहे. स्पर्धेदरम्यान अनेक अडथळे आले आणि त्यामुळे आम्हाला वारंवार संघात बदल करावे लागले.” असं स्कालोनी म्हणाले.

पराभवाची वेदना दीर्घकाळ मनात राहील, याची कबुली देतानाच स्कालोनी यांनी खेळाडूंनी मैदानावर सर्वस्व झोकून दिल्याचं अधोरेखित केलं. “विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणता आली नाही, याचं आमच्या मनाला खूप दुःख आहे. मात्र, माझ्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे. स्पेनने गोल केल्यानंतरही आम्हाला वाटत होतं की, सामना शेवटपर्यंत नेऊन कदाचित पेनल्टी शूटआऊटची संधी मिळू शकते. आजच्या सामन्यात स्पेनने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. त्यांच्या कामगिरीचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं.”