फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या थरारक सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाचा संघ सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलसाठी पात्र ठरला आहे. फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेनविरुद्ध होणार आहे. दरम्यान सेमी फायनलचा सामना झाल्यानंतर, अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील थरारक सामना अटलांटा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मैदानावर अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पण मैदानाबाहेर जे घडलं, ते योग्य नव्हतं. सामन्यानंतर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात, तुम्ही पाहू शकता की, अर्जेंटिनाने काही चाहते इंग्लंडच्या एका जोडप्याला मारहाण करताना दिसून येत आहेत. एक महिला मध्यस्थी करताना दिसून येत आहे. पण तरीदेखील अर्जेंटिनाचे चाहते मारहाण करताना दिसून येत आहेत. या वादाचं नेमकं कारण काय? याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

अर्जेंटिनाचा दमदार विजय

या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने गोल करून दमदार सुरुवात केली. सामन्यातील ५५ व्या मिनिटाला गॉर्डनने गोल केला आणि इंग्लंडने १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर अर्जेंटिनाला ८५ व्या मिनिटापर्यंत एकही गोल करता आला नव्हता. पण त्यानंतर फर्नेंडाजने गोल करत स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला. त्यानंतर ९२ व्या मिनिटाला मार्टिनेजने निर्णायक गोल केला आणि अर्जेंटिनाने हा सामना २-१ ने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.

या स्पर्धेतील फायनलचा सामना न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन या दोन बलाढ्य संघामध्ये होणार आहे. अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार रविवारी १९ जुलैला रात्री ८ वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना सोमवारी २० जुलैला मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला जर हा सामना पाहायचा असेल, तर रात्री उशिरापर्यंत जागावं लागेल.