साओ पावलो

पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलने गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतरही अर्जेटिनाला पुढील वर्षी कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आले. अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीला पहिला ‘फिफा’ विश्वचषक जिंकण्याची पाचवी आणि बहुधा अखेरची संधी मिळणार आहे.

पात्रता फेरीच्या दक्षिण अमेरिकन विभागात ब्राझीलने सर्वात आधी विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरील एक्वाडोरने चिलीला २-० असे पराभूत केल्याने दुसऱ्या स्थानावरील अर्जेटिनाचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला. दक्षिण अमेरिकन विभागातून चार संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश करतील, तर गुणतालिकेतील पाचव्या संघाला आंतरखंडीय बाद फेरीत खेळावे लागेल.

पात्रता फेरीच्या १३ सामन्यांनंतर अव्वल स्थानावरील ब्राझीलच्या खात्यात ३५ गुण असून त्यांच्यात आणि अर्जेटिनामध्ये सहा गुणांचा फरक आहे. सप्टेंबरमध्ये या दोन संघांतील सामना करोना नियमांच्या उल्लंघनामुळे स्थगित करण्यात आला होता. या सामन्याबाबतचा अंतिम निर्णय फिफा घेणार आहे. 

आठ वर्षांनंतर नेदरलँड्सचे पुनरागमन

स्टिव्हन बर्गवाइन आणि मेम्फिस डिपे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर नेदरलँड्सने नॉर्वेचा २-० असा पराभव करत तब्बल आठ वर्षांनंतर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. आतापर्यंत नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्र्झलड, क्रोएशिया आणि सर्बिया या संघांनी विश्वचषकातील प्रवेश पक्का केला आहे.