FIFA WC Semi finals schedule 2026: फिफा विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. फिफा विश्वचषकातील टॉप-४ संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि अर्जेंटिनाचे संघ सेमीफायनलमध्ये भिडणा आहेत. फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनासमोर इंग्लंडचं, तर स्पेनसमोर फ्रान्सचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघांनीच अंतिम चारमध्ये धडक मारल्याने आता स्पर्धेचा शेवट अत्यंत रोमांचक होणार आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, त्यापैकी बहुतांश संघांनी अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरी गाठली आहे. ब्राझीलचा अपवाद वगळता, दोन्ही बाजूंच्या ड्रॉमधील जवळपास सर्व प्रमुख दावेदारांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवलं असून, आता विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी दोन हायव्होल्टेज लढती रंगणार आहेत.

फ्रान्सने मोरोक्कोवर संपूर्ण वर्चस्व गाजवत २-० असा विजय मिळवला. किलियन एम्बाप्पे आणि उस्मान डेंबेले यांनी अनुक्रमे ६०व्या आणि ६६व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला उपांत्य फेरीत पोहोचवलं. उर्वरित तीनही उपांत्यपूर्व फेरीचे सामने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगले. स्पेनने मिकेल मेरिनोच्या ८७व्या मिनिटातील निर्णायक गोलच्या जोरावर बेल्जियमचा २-१ असा पराभव केला.

इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत नॉर्वेवर २-१ असा विजय मिळवला. ज्युड बेलिंगहॅमने दोन्ही हाफच्या अतिरिक्त वेळेत प्रत्येकी एक गोल केला, ज्यामध्ये ९३व्या मिनिटातील विजयी गोलाचाही समावेश होता. तर अर्जेंटिनानेही अतिरिक्त वेळेपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात स्वित्झर्लंडचा ३-१ ने पराभव करत अखेर उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

इंग्लंड-अर्जेंटिना दुसरी सेमीफायनल किती वाजता सुरू होणार?

पहिला सेमीफायनल सामना स्पेन आणि फ्रान्स यांच्यात बुधवारी १५ जुलैला रात्री १२.३० वाजता खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री १२.३० वाजता खेळवला जाईल. तर सेमीफायनलमधील दुसरा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात १६ जुलैला गुरूवारी रात्री १२.३० वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना अटलांटामधील मर्सिडीज बेंज स्टेडियममध्ये होणार आहे.

उपांत्य फेरीतील दोन्ही विजेते संघ रविवारी (१९ जुलै) न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील. तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांमध्ये शनिवारी (१८ जुलै) मायामीतील हार्ड रॉक स्टेडियमवर तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळवला जाईल.

अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या सर्व संघांनी यापूर्वी विश्वचषक जिंकला असल्याने यंदा स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार नसल्याचंही निश्चित झालं आहे. अर्जेंटिना चौथ्या (१९७८, १९८६, २०२२) विश्वविजेतेपदाच्या शोधात आहे, तर फ्रान्स तिसऱ्यांदा (१९९८, २०१८) चषक उंचावण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, स्पेन (२०१०) आणि इंग्लंड (१९६६) प्रत्येकी दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.