England Goal Keeper Secret Bottle: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये थरारक सामना रंगला. इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण शेवटच्या ७ मिनिटांत अर्जेंटिनाने इंग्लंडकडून विजय हिसकावून घेतला. हा सामना जिंकून, अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना स्पेनविरुद्ध होणार आहे. या सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या विजयासह आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली, ती म्हणजे, इंग्लंडचा गोलकीपर जॉर्डन पिकफोर्डच्या पाण्याच्या बॉटलची. ही बॉटल अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या हाती लागताच, कर्णधार मेस्सीला आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांना हसू अनावर झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा गोलकीपर जॉर्डन पिकफोर्ड हा महत्वाच्या सामन्यांमध्ये पेनल्टी शूटआऊटसाठी एक खास रणनीती आखण्यासाठी ओळखला जातो. पेनल्टी शूटआऊटमध्ये विरोधी संघातील खेळाडूंचे डाव हाणून पाडण्यासाठी तो काय करतो, यामागचं सर्वात मोठं गुपित आता उघड झालं आहे. विरोधी संघातील खेळाडू पेनल्टीदरम्यान कोणत्या बाजूला गोल करतात, हा गोल अडवण्यासाठी कोणत्या बाजूला डाईव्ह मारायला हवी याची तो हस्तलिखित नोट्स तयार करतो. अर्जेंटिनाविरुद्धचा सामना देखील पेनल्टी शूटआऊटमध्ये जाण्याची दाट शक्यता होती. पेनल्टीसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी त्याने आधीच मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांची संपूर्ण माहिती बॉटलवर लिहून ठेवली होती.

इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना संपल्यानंतर पिकफोर्डची पाण्याची बॉटल अर्जेंटिनाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याच्या हाती लागली. त्याने ही बॉटल अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे आणली. त्यानंतर मेस्सी आणि संघातील इतर खेळाडूंनी ही बॉटल पाहिली. त्यावेळी पिकफोर्डची मैदानात उतरण्याआधीची जोरदार तयारी आणि प्लॅनिंग पाहून अर्जेंटिनाच्या खेळाडूंना हसू आवरलं नाही. मेस्सीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेस्सी पेनल्टीमध्ये कोणत्या बाजूला गोल मारतो आणि तो गोल थांबवण्यासाठी कोणच्या बाजूला डाईव्ह मारायला हवी हे त्याने आपल्या नोट्समध्ये लिहिले आहे. या सामन्यात मेस्सी तर गोल करू शकला नाही, पण इतर खेळाडूंनी गोल करुन अर्जेंटिनासाठी विजय खेचून आणला. इंग्लंडकडून गॉर्डनने ५५ व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि इंग्लंडला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ८५ व्या मिनिटाला फर्नांडेजने गोल करुन स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला. त्यानंतर ९२ व्या मिनिटाला मार्टिनेजने गोल केला आणि अर्जेंटिनाला हा सामना २-१ ने जिंकून दिला.