Lamine Yamal – Lionel Messi Viral Video: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा थरार अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. न्यूयॉर्कमधील न्यूजर्सीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात या स्पर्धेतील सर्वात थरारक सामना पार पडला. आतापर्यंत दोन्ही संघांनी दमदार खेळ करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. अर्जेंटिनाचा या स्पर्धेतील फॉर्म पाहता, अर्जेंटिनाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण लामिन यामलच्या स्पेनने दाखवून दिलं की, आम्ही कोणापेक्षा कमी नाही. या सामन्यात एकमेव गोल झाला, जो फेरान टॉरेसने केला. या गोलच्या बळावर स्पेनने अर्जेंटिनावर १-० ने थरारक विजय मिळवला. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर १९ वर्षांच्या लामिन यामलचा एक मन जिंकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्पेनचा युवा स्टार लामिन यामल हा अवघ्या १९ वर्षांचा आहे. पण इतक्या कमी वयातही त्याने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता १९ व्या वर्षी त्याच्या नावे फिफा वर्ल्डकप जिंकण्याची नोंद झाली आहे. ज्यावेळी स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ फिफा वर्ल्डकपची फायनल खेळणार, हे ठरलं. त्यावेळी एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे, लामिन यामल आणि लिओनेल मेस्सीचा आमना सामना पाहायला मिळणार. पण दोघेही या सामन्यात गोल करु शकले नाहीत. दोघांनी संपूर्ण स्पर्धेत आपल्या संघासाठी दमदार खेळ केला. पण फायनलमध्ये टॉरेसच्या गोलच्या बळावर स्पेनने बाजी मारली.
लामिन यामलची मन जिंकणारी कृती
लामिन यामल या सामन्यात तर योगदान देऊ शकला नाही, पण सामन्यानंतर त्याने एक मन जिंकणारी कृती केली आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकपची फायनल जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता. पण ही संधी थोडक्यात हुकली. त्यामुळे सामन्यानंतर त्याचे डोळे पाणावले होते. त्यावेळी १९ वर्षांचा लामिन यामल त्याला धीर देण्यासाठी तिथे पोहोचला. तो मेस्सीच्या जवळ गेला, त्याला मिठी मारली. लामिन यामल स्पेनकडून खेळतो. पण क्लब लेव्हलला तो बार्सिलोना संघाचं प्रतिनिधित्व करतो. हा तोच क्लब आहे, ज्या संघाकडून आधी मेस्सीही खेळायचा. त्यामुळे दोघेही एकमेकांना चांगलं ओळखतात. काही दिवसांपूर्वी मेस्सी आणि यामलचा एक जूना फोटो व्हायरल झाला होता. ज्यात मेस्सी यामला अंघोळ घालताना दिसून येत होता.
स्पेनचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये दमदार खेळ पाहायला मिळाला. पण बाजी शेवटी स्पेनने मारली. ९० मिनिटांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. त्यामुळे हा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. एक्स्ट्रा टाईममध्ये १०६ मिनिटाला स्पेनचा स्टार विंगर फेरान टॉरेसने या सामन्यातील पहिला गोल केला. हा या सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल ठरला. शेवटी स्पेनने हा सामना १-० ने जिंकून इतिहास घडवला आहे. स्पेनने १६ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
