Silver in men’s lightweight double scull: रविवार, २४ सप्टेंबर २०२३ रोजी हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रोईंगमध्ये चमकदार कामगिरी केली. भारताने २ रौप्य आणि १ कांस्य पदकांसह ३ पदके जिंकली. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुरुषांच्या जोडीमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव या जोडीने कांस्यपदक पटकावले. यानंतर पुरुषांच्या सांघिक ८ स्पर्धेत रौप्यपदक मिळाले.
अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंगसाठी हा मार्ग सोपा नव्हता. पाठीच्या दुखापतीमुळे अरविंदच्या खेळांच्या तयारीवर परिणाम झाला. जवळपास महिनाभर प्रशिक्षण घेता आले नाही. यानंतरही त्याने चमकदार कामगिरी करत देशासाठी रौप्यपदक जिंकून दिले. भारतीय जोडी ६:२८.१८ सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावले. जंजी फॅन आणि मॅन सन ऑफ चायना ६:२३.१६ सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदक जिंकले. उझबेकिस्तानच्या शाखझोद नुरमातोव आणि सोबिरजोन सफ्रोलीव्ह यांनी कांस्यपदक जिंकले.




अरविंदच्या पाठीच्या दुखापतीमुळे तयारी विस्कळीत –
पदक जिंकल्यानंतर अरविंदने आपले लक्ष्य सुवर्ण असल्याचे सांगितले, मात्र दोन महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे त्याची तयारी ठप्प झाली होती. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकण्याचे पुढील लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, “माझ्या पाठीला दुखापत झाल्यामुळे आम्ही २०-२५ दिवस सराव करू शकलो नाही. आता आम्ही पॅरिस ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करू आणि २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा प्रयत्न करू.” त्याचा सहकारी अर्जुन म्हणाला, “आम्ही सुवर्ण जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आमचे प्रशिक्षक म्हणाले होते की तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करा. आम्ही आमच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती करू शकलो नाही, जी आम्ही पुण्यातील आर्मी नोडल सेंटरमध्ये केली होती.”
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
कॉक्स ८ स्पर्धेत चीनकडून कडवी स्पर्धा होती –
पुरुषांच्या कॉक्स ८ स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली, ज्यामध्ये भारतीय संघाने ५:४३.०१ वेळ नोंदवून दुसऱ्या स्थानावर राहिला. चीनने २.८४ सेकंदाने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघात नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. इंडोनेशियाला कांस्यपदक मिळाले. जपान आणि उझबेकिस्तानसारख्या रोइंग दिग्गजांचे संघ अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या स्थानावर राहिले.
बाबूलाल यादव आणि लेख राम या जोडीला मिळाले कांस्यपदक –
भारताच्या बाबूलाल यादव आणि लेख राम यांना कॉक्सलेस जोडीमध्ये कांस्यपदक मिळाले, ज्यांनी ६:५०.४१ सेकंदाची वेळ नोंदवली. चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. भारताने रोइंगमध्ये ३३ सदस्यीय संघ पाठवला आहे. आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५ पदके जिंकली आहेत. ३ रौप्य आणि २ कांस्यपदक आले आहेत. बांगलादेशचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. म्हणजे क्रिकेटमध्येही पदक निश्चित झाले आहे.