नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन २०२०-२१च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून हरयाणा आणि पुडिचेरी संघांविरुद्धच्या दोन सामन्यांत खेळला होता. अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

अर्जुनच्या कारकीर्दीसाठी अधिकाधिक सामने मिळणे आवश्यक आहे, असे एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने म्हटले आहे. तीन हंगामांआधी अर्जुन श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता. गेल्या हंगामात मात्र मुंबई संघातून त्याला वगळण्यात आले होते.