आज (१९ जून) जगभरात ‘फादर्स डे’साजरा होत आहे. त्यानिमित्त सामान्य नागरिकांपासून ते अनेक लोकप्रिय सेलिब्रिटिंनी आपापल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी आणि मुलांसाठी भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसुद्धा आजच्या दिवशी भावुक झाला आहे. सचिनच्या लेकाने त्याच्यासाठी स्वयंपाकाचे प्रयोग केले आहेत. खुद्द सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

“अर्जुनने आज बनवलेले स्क्रॅम्बल्ड एग्जला जगातील सर्वोत्तम चव आहे. त्याचा पोत आणि चव खूप चांगली होती! त्यामध्ये त्याचे प्रेम आहे…यापेक्षा मौल्यवान काही असू शकत नाही, ” अशी पोस्ट सचिनने केली आहे. त्यासोबत त्याने अर्जुनसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे.

त्यापूर्वी, सचिनने देखील आपल्या दिवंगत वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. “प्रत्येक मुलासाठी त्याचे वडिल हे त्याचे पहिले हिरो असतात. मीही त्यातलाच एक आहे. त्यांची शिकवण मला आजही आठवते. त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि मला केलेले मार्गदर्शन मला आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा!”, अशी पोस्ट करत सचिनने एक व्हिडिओ शेअर केला होता.

त्यानंतर आता अर्जुनेदेखील आपल्या वडिलांसाठी स्वत: स्वयंपाक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन हा सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचा धाकटा मुलगा आहे. २२ वर्षीय अर्जुनने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटची निवड केली आहे. अर्जुन मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो. याशिवाय, आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने खरेदी केलेले आहे. मात्र, त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही.