Arjun Tendulkar Yorker Bowling In Nets: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाने गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघावर दमदार विजयाची नोंद केली. लखनौने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. पण या दोन्ही सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या हंगामापर्यंत तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण आयपीएल २०२६ स्पर्धेच्या लिलावाआधी लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला ३० लाख रुपयात ट्रेड केलं आहे. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नसली तरीदेखील तो नेट्समध्ये स्वतःला सिद्ध करताना दिसून येत आहे. नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्याने टाकलेल्या यॉर्कर्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्जुन तेंडुलकरची दमदार गोलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो नेट्समध्ये दमदार गोलंदाजी करताना दिसून येत आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. त्याला मुंबईकडूनही मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली. पण जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगाच्या मार्गदर्शनाचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. ज्या वेगाने आणि ज्या अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय, ते पाहता मोठ मोठे फलंदाज संघर्ष करताना दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऋषभ पंत नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. तर अर्जुन तेंडुलकर त्याला एकापाठोपाठ एक अचूक यॉर्कर टाकताना दिसून येत आहे. त्याचे हे भन्नाट वेगाने येणारे यॉर्कर पाहून ऋषभ पंतदेखील शॉक झाला आहे. त्याची ही गोलंदाजी पाहता लवकरच तो प्लेईंग ११ मध्ये खेळताना दिसून येऊ शकतो.
आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्यात लखनौचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
