Arjun Tendulkar Viral Video: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या टी-२० मुंबई लीग स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत दमदार अष्टपैलू कामगिरी करुन तो आपल्या संघासाठी विजयाचा हिरो ठरतोय. या स्पर्धेतील १६ वा सामना आर्क्स अंधेरी आणि बांद्रा ब्लास्टर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करताना त्याने ६६ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने मारलेला एक चेंडू सामना पाहण्यासाठी आलेल्या लहान मुलाच्या डोक्याला जाऊन लागला. सामना झाल्यानंतर अर्जुनने त्या मुलाची भेट घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकर हा गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेचा भाग आहे. पण त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याला बाकावर बसून राहावं लागलं होतं. त्यानंतर आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने आपल्या संघात स्थान दिलं. पण शेवटच्या सामन्यापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी दिली नव्हती. लखनौचा संघ जेव्हा स्पर्धेतून बाहेर पडला, त्यावेळी त्याला शेवटचा १ सामना खेळण्याची संधी दिली. या सामन्यातही त्याने उत्तम गोलंदाजी केली होती. सध्या तो टी-२० मुंबई लीग स्पर्धेत आर्क्स अंधेरी संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून खेळताना त्याची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे. बांद्रा ब्लास्टर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना त्याने नाबाद ६६ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

अर्जुनची मन जिंकणारी कृती

या अर्धशतकी खेळीदरम्यान अर्जुनने काही मोठे फटके देखील मारले. यादरम्यान त्याने मिडविकेटच्या वरुन मारलेला चेंडू स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या लहान मुलाच्या डोक्याला जाऊन लागला. चेंडू लागताच तो वेदनेने कळवळताना आणि रडताना दिसून आला. हे अर्जुनने पाहिलं आणि सामना झाल्यानंतर त्या लहान मुलाची भेट घेतली. त्याची विचारपूस केली आणि त्याला ऑटोग्राफही दिला. अर्जुनचा हा मन जिंकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टी-२० मुंबई लीग स्पर्धेत आर्क्स अंधेरी आणि बांद्रा ब्लास्टर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना बांद्रा ब्लास्टर्स संघाचा डाव अवघ्या १४४ धावांवर आटोपला. यादरम्यान अर्जुन तेंडुलकरने ३ गडी बाद केले. आर्क्स अंधेरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अर्जुन तेंडुलकर आणि मुशीर खान यांनी मिळून शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अर्धशतकं झळकावून आर्क्स अंधेरी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.