अर्जुन तेंडुलकराला अंतिम अकरात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्याविषयी चर्चाच करायला नको अशा शब्दांत टीम इंडियाचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने परखड मत व्यक्त केलं आहे. यंदाच्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने ट्रेडऑफमध्ये अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपरजायंट्सकडे सुपुर्द केलं होतं. लखनौ सुपरजायटंस संघाकडूनही अर्जुनला ३० लाख रुपये मानधन मिळणार आहे.
लखनौ संघाकडे वेगवान गोलंदाजांची मोठी फळी आहे. त्यामुळे अर्जुनला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे. मयांक यादव, मोहसीन खान, अवेश खान, मोहम्मद शमी असे गोलंदाज लखनौकडे आहेत. हे वेगवान गोलंदाज आहेत. फिरकीपटू वेगळे. प्रमुख गोलंदाजांपैकी कोणाला दुर्देवाने दुखापत झाली तरच अर्जुनला संधी मिळू शकते. अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता.
कोरोना काळात झालेल्या हंगामात अर्जुन मुंबई इंडियन्स चमूचा भाग होता. २०२३ मध्ये त्याने पदार्पण केलं. आतापर्यंत अर्जुन ५ सामने खेळला असून, त्याने ३ विकेट्स पटकावल्या आहेत.
बादफेरीसाठी लखनौचा संघ पात्र ठरण्याची शक्यता कमी आहे असं अश्विनला वाटतं. टॉप४ मध्ये कोणते संघ असतील याचे माझे काही आडाखे आहेत. चौथा-पाचवा आणि सहाव्या क्रमांकाचा संघांमध्ये अव्वल चारसाठी चुरस असेल. लखनौ टॉप६मध्येही नसेल.
लखनौ सुपरजायंट्सची सलामीची लढत १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. लखनौनं जर्सीचा रंग बदलला आहे. २०२२ मध्ये लखनौ संघाने आयपीएल पदार्पण केलं. पहिल्यावहिल्या हंगामात लखनौने प्लेऑफ्समध्ये धडक मारली होती. त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २०२३ हंगामातही त्यांनी प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला. मात्र २०२४ आणि २०२५ असे सलग दोन हंगामात त्यांना प्लेऑफसाठी पात्र होता आलेलं नाही.
सुरुवातीच्या हंगामांमध्ये के.एल.राहुलकडे लखनौचं नेतृत्व होतं. आता ऋषभ पंतकडे लखनौची धुरा आहे.
