Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding Video: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकसह लग्नबंधनात अडकला आहे. अर्जुन आणि सानियाचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या या शाही लग्नसोहळ्याचा पहिला व्हीडिओ समोर आला आहे. अर्जुन सानियाला वरमाला घालत असतानाचा हा व्हीडिओ आहे. अर्जुन व सानिया एकमेकांना वरमाला घालतानाचा हा व्हीडिओ असून यामधील सचिन व अंजलीच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सानिया-अर्जुनच्या सर्व लग्नसोहळ्याचे विधी हे मुंबईत पार पडले.

अर्जुन व सानियाने लाल रंगाचे आऊटफिट घातले आहेत. अर्जुन लाल रंगाचा कुर्ता घातला आहे, तर सानियाने सुंदर लाल रंगांची साडी नेसली आहे. तर संपूर्ण तेंडुलकर कुटुंबानेही ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केले आहेत. अर्जुन व सानियाने एकमेकांना वरमाला घालताच मिठी मारली. सानिया-अर्जुनला पाहून सचिन व पत्नी अंजली आनंदाने हसत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावार उरला नव्हता. तर हातात करा घेऊन उभी असलेली बहिण सारा तेंडुलकरदेखील आनंदी दिसत होती.

३ मार्चला मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे एक मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता, जिथे अनेक क्रिकेट जगतातील दिग्गज उपस्थित होते. सचिनचे जवळचे मित्र, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी मेहंदी सोहळ्याला उपस्थित होते. ज्यात रवी शास्त्री, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता. तर दिग्गज नेते राज ठाकरे यांनीदेखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. आता, लग्नातही पाहुण्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळपासूनच तेंडुलकरांच्या घरच्या या शाही लग्नसोहळ्याला दिग्गजांनी उपस्थिती लावली होती, ज्याचे विविध व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यामध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या पत्नीसोबत दिसला. माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ता अजित आगरकर त्यांच्या पत्नीसोबत पोहोचले. राहुल द्रविड त्यांच्या पत्नी विजेता पेंढारकरसह पोहोचला आहे. तर किरण मोरे, अनिल कुंबळे, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि वेंकटेश प्रसाद यांनीदेखील सहपत्नी या समारंभाला उपस्थिती दर्शवली.

क्रिकेटमधील दिग्गजांशिवाय राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, आशिष शेलार व सुप्रिया सुळे हे राजकारणातील उच्चपदस्थ चेहरे उपस्थित होते. याशिवाय गायिका आशा भोसले यांनीदेखील या लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली. तर बॉलीवूडमधून संपूर्ण बच्चन कुटुंबिय अर्जुन-सानियाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचलं. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, नीता अंबानी व मुकेश अंबानी हे देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित आहेत.